वर्धा : पारधी वस्ती म्हंटलं की शिक्षणापासून वंचित असलेला घटक लक्षात येतं. आजही अनेक पारधी वस्त्यांची हीच परिस्थिती दिसून येते. म्हणून वर्धा जिल्ह्यातील आगरगाव जवळ असलेल्या पारधी वस्तीतील सामाजिक कार्यकर्त्याने मोठा निर्णय घेतला आहे.
आपला समाज शिक्षणाच्या प्रवाहात यावा, मुलांनी शिक्षण घेऊन नावलौकिक मिळवावे या उद्देशाने पारधी वस्तीत निशुल्क बालसंस्कार वर्ग आणि लोकशिक्षण वर्ग घेण्यास सुरुवात केली. अचीन पवार असे या सामाजिक कार्यकर्त्याचे नाव आहे. याठिकाणी बालसंस्कार वर्गाच्या माध्यमातून वस्तीतील मुलांना संस्कार आणि अनेक चांगल्या गोष्टी शिकविल्या जाऊ लागल्या तसेच गावातील ज्या नागरिकांना आपल्याला थोडं तरी लिहिता-वाचता यावं असं वाटतं, त्यांना शिकविले जाऊ लागले. हळूहळू गावकरी आणि मुलांना शिक्षणाप्रती आवड, ओढ निर्माण झाली आणि सामाजिक कार्यकर्ते अचीन पवार यांचा प्रयत्न यशस्वी झाला.
advertisement
याच कार्याची दखल घेऊनअव्यक्त अबोली बहुउद्देशीय संस्था पुलगाव द्वारा अचीन पवार यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. यामुळे याठिकाणी मोठा आनंद व्यक्त केला जात आहे.
पारधी वस्तीत छोटेसे वाचनालय -
सचिन पवार यांच्या प्रयत्नाने पारधी वस्तीतील नागरिक आणि विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आले. त्यानंतर वाचनालय सुरू करण्यात आले. हे वाचनालय अगदी छोटसं आहे. वस्तीतील विद्यार्थ्यांसाठी मात्र फायद्याचे ठरत आहे. विटांच्या चार भिंती उभारून हे वाचनालय सध्या सुरू आहे त्यात सामाजिक लोकसहभागातून जमा झालेले काही पुस्तकही विद्यार्थ्यांकरिता वाचनासाठी उपलब्ध झाले आहेत.
लठ्ठपणापासून ते हाय ब्लडप्रेशरपर्यंत, फूल एक फायदे अनेक, 22 आजारांवर फायदेशीर
सुरुवातीला अनेक अडचणी -
2016 मध्ये या कार्याची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांना शिक्षणाचे प्रवाहात आणण्यासाठी केलेली धडपड आजही अचिन पवार यांच्या आठवणीत आहे. वाचनालय उभारण्यासाठी आणि निशुल्क शिक्षण शिकवणी वर्ग घेण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं. त्यातूनही जिद्द न सोडता अचिन पवार यांनी आपले प्रयत्न चालू ठेवले आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाप्रती ओढ आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून दिलं.
आता अनेक पालकांमध्येही शिक्षणाचे महत्त्व दिसू लागले आहे. त्यामुळे ते आपल्या पाल्यांना आवर्जून शिकवणी वर्गासाठी पाठवत आहेत. एका विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आज तब्बल 40 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. सामाजिक कार्यकर्ते अचीन पवार यांचा शिक्षणाचा ध्यास आणि ज्ञानदानाचं कार्य कौतुकास्पद आहे.