मुंबई : राज्यात आता पावसाला सुरूवात झालीये. बहुतांश भागातल्या वातावरणात पावसामुळे छान गारवा निर्माण झालाय. आता पुढे हा पाऊस असाच सुरू राहण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तविली आहे. 11 जून रोजी राज्यातलं वातावरण कसं असेल जाणून घेऊया.
advertisement
मुंबई, पुणे आणि कोल्हापूर शहरात झालेल्या धो धो पावसामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झालं. आता पुन्हा एकदा इथं सोसाट्याचे वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय. मुंबईत पुढचे 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे असण्याची शक्यता आहे. तर, पुण्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो. तसंच कोल्हापुरातही वादळी वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
हेही वाचा : जालन्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस, अनेक घरांची पत्रे उडाली, घटनास्थळाचे धक्कादायक PHOTOS
मुंबईत 11 जून रोजी कमाल तापमान 35°C आणि किमान तापमान 27°C असण्याचा अंदाज आहे. तर, पुण्यात कमाल तापमान 32°C आणि किमान तापमान 26°C इतकं असू शकतं. कोल्हापूरचं कमाल तापमान 30°C आणि किमान तापमान 25°C इतकं असण्याची शक्यता आहे.
विदर्भात हवामान विभागानं पावसाचा यलो अलर्ट जारी केलाय. नागपूरचं तापमान 11 जून रोजी 37°C कमाल आणि 29°C किमान असण्याची शक्यता आहे. तर, मराठवाड्यात 24 तासांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये 11 मे रोजी कमाल तापमान 35°C आणि किमान तापमान 27°C एवढं असण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज असल्यानं नागरिकांनी या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घ्यावी. छत्री घेऊनच घराबाहेर पडावं आणि साथीच्या आजारांपासून स्वतःला जपावं, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय.





