नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला दणदणीत विजय मिळाला आहे. 288 जागांपैकी 233 जागांवर महायुतीचा विजय झाला आहे, यात भाजपने सर्वाधिक 132 जागा जिंकल्या आहेत, तर शिवसेनेला 57 आणि राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढली असल्यामुळे आणि यात त्यांना यश मिळाल्यामुळे शिंदेंनाच मुख्यमंत्री करा, अशी मागणी शिवसेना नेत्यांकडून केली जात आहे.
advertisement
भाजपकडून क्लिअर मेसेज
एकीकडे शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी जोरदार बॅटिंग केली जात असताना भाजपने मुख्यमंत्रिपदाबाबत दिल्लीतून क्लिअर मेसेज दिला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय आज दिल्लीत होणार आहे. दिल्लीमध्ये आज रात्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची अमित शाहांसोबत बैठक होण्याची शक्यता आहे. भाजप नेते एकनाथ शिंदे यांना समजावण्याचा प्रयत्न करणार आहेत, तसंच मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव आघाडीवर आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मराठा मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वात निवडणूक लढली पण मुख्यमंत्री ब्राह्मण केला तर वेगळा मेसेज जाऊ शकतो. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात निवडणूक लढली, त्यांना लोकांनी स्वीकारलं आहे. एकनाथ शिंदे यांना समजावलं जात आहे, त्यांना काही अधिकची पदं दिली जातील, असं भाजपच्या दिल्लीतल्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदासाठी बिहार पॅटर्नवर फुली मारण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा, असं दिल्लीतल्या भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याचं मत आहे. एवढ्या चांगल्या जागा निवडून आल्या असताना मुख्यमंत्रिपद सोडणं योग्य नाही, असं मत भाजपच्या नेत्याने मांडलं आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या नावावर आज चर्चा करून दिल्लीत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
