मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे. 288 जागांपैकी तब्बल 230 जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकले आहेत. भाजप हा 132 जागांवर विजय मिळवत पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. तर शिवसेनेने 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 41 जागा जिंकल्या आहेत. महायुतीचा या धमाकेदार कामगिरीनंतर पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, यासाठी शिवसेनेच्या नेत्यांकडून जोरदार बॅटिंग सुरू आहे, त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
advertisement
मुख्यमंत्री हा भाजपचाच व्हावा, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप पक्षश्रेष्ठींकडे स्पष्ट केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता भाजपपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसही भाजपचा मुख्यमंत्री व्हावा, यासाठी आग्रही आहे. मुख्यमंत्री कोण? हा भाजपचा अंतर्गत निर्णय असला तरी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला राष्ट्रवादीची पसंती आहे, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे.
अमित शाहांसोबत बैठक
दरम्यान आज रात्री महायुतीच्या नेत्यांची नवी दिल्लीमध्ये अमित शाहांसोबत बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमित शाहांसोबतच्या या बैठकीला एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस हे दिल्लीसाठी रवाना झाले आहेत.
