मुंबई : कोल्हापूर म्हटलं की शाही इतिहास, कोल्हापुरी चप्पल आणि तांबडा-पांढरा रस्सा डोळ्यांसमोर उभा राहतो. मात्र या सांस्कृतिक वैभवात जितकी महत्त्वाची जागा मसाल्यांना आहे, तितकीच गोड ओळख कोल्हापुरी गुळालाही आहे. तांबड्या सुपीक मातीतून पिकणारा ऊस आणि त्यातून तयार होणारा गूळ हा कोल्हापूरच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा अनेक दशकांपासून कणा राहिला आहे. सुमारे दोनशे वर्षांपूर्वीपासून कोल्हापुरी गुळाचा गोडवा महाराष्ट्रातच नव्हे तर बाहेरच्या बाजारपेठांमध्येही परिचित होता.
advertisement
कोल्हापूरी गुळाचा इतिहास काय?
इतिहासाची पाने चाळली तर कोल्हापूर जिल्ह्याची आर्थिक नाडी त्या काळी गूळ उद्योगावर अवलंबून होती, हे स्पष्ट होते. ब्रिटिश काळातील दस्तऐवजांनुसार 1800 च्या दशकात कोल्हापुरात दरवर्षी 4,296 खंडी म्हणजेच सुमारे 1 हजार टन गुळाचे उत्पादन होत असे. यावेळी गुळाच्या बाजाराची वार्षिक उलाढाल तब्बल 1 लाख 20 हजार रुपयांहून अधिक होती, जी आजच्या हिशोबात कोट्यवधी रुपयांइतकी मानली जाते. त्या काळात गुऱ्हाळघरे ही गावागावातील दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग होती.
पारंपरिक गुऱ्हाळघरे
त्याकाळातील गुळनिर्मिती पूर्णपणे कष्टावर आधारलेली होती. लाकडी चरख्यांतून बैलांच्या सहाय्याने उसाचा रस काढला जाई. हा रस मोठ्या लोखंडी कढईत तासंतास उकळून जमिनीत तयार केलेल्या साच्यांत ओतला जाई. यातून 20 ते 30 किलो वजनाच्या गुळाच्या ढेपा तयार होत. आजच्या अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या तुलनेत ही प्रक्रिया जरी जुनी वाटत असली, तरी त्या काळी प्रत्येक गावात गुऱ्हाळघरांची लगबग दिसायची.
त्या काळातील खर्च आणि नफा किती होता?
ब्रिटिश दस्तऐवजांनुसार 25 गुंठे जमिनीतून गूळ तयार करण्यासाठी सुमारे 47 ते 48 रुपयांचा थेट खर्च येत असे. ऊस लागवड, देखभाल आणि गूळनिर्मिती मिळून एकूण खर्च 193 रुपयांच्या आसपास होता. एवढ्या खर्चानंतरही शेतकऱ्यांना प्रति बिघा 29 रुपयांपर्यंत निव्वळ नफा मिळत असे. कमी दर्जाच्या उसावरही नफा शिल्लक राहत होता. यावरून गूळ उद्योग हा त्या काळी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मजबूत आधार होता, हे लक्षात येते.
उतरती कळा का लागली?
दुर्दैवाने गेल्या दोन दशकांत कोल्हापुरी गुळाला उतरती कळा लागली असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. एकेकाळी जिल्ह्यात 1200 पेक्षा जास्त गुऱ्हाळघरे होती, ती संख्या आज अवघी 80 ते 90 वर येऊन ठेपली आहे. साखर कारखान्यांचा विस्तार, बदललेली बाजारव्यवस्था, वाढता खर्च आणि पारंपरिक उद्योगाकडे होणारी दुर्लक्ष ही यामागची प्रमुख कारणे मानली जात आहेत.
वारसा जपण्याची गरज
आज गुळाचे उत्पादन प्रमाणाने वाढले असले, तरी गुऱ्हाळघरांची संख्या घटत चालली आहे, ही चिंतेची बाब आहे. कोल्हापुरी गूळ हा केवळ एक पदार्थ नाही, तर कोल्हापूरच्या संस्कृतीचा गोड वारसा आहे. हा वारसा टिकवण्यासाठी पारंपरिक गुऱ्हाळघरे वाचवणे अत्यावश्यक आहे. सरकार, स्थानिक संस्था आणि शेतकरी यांनी एकत्रित प्रयत्न केल्यास कोल्हापुरी गुळाचा गोडवा पुढील अनेक पिढ्यांपर्यंत टिकून राहू शकतो
