राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संत नामदेव महाराजांच्या नावाने पुरस्कार जाहीर झाला. आज पंढपूरमध्ये एकनाथ शिंदे यांना पुरस्कार देण्यासाठी वारकरी संप्रदायातील बडे महाराज मंडळी उपस्थित होते. संत नामदेव महाराज यांच्या 675 वा समाधी सोहळ्या निमित्त शिंदे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना पत्रकारांनी मंत्रिमंडळामध्ये लवकरच फेरबदल होणार आहे, कोणत्या मंत्र्यांना डच्चू दिला जाईल, असा प्रश्न विचारला असता एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली.
advertisement
"रोज राजकारणाला प्रश्न आहे, आम्ही टीम म्हणून काम करतोय. पद खाली वर होत असतात. सर्वसामान्यांना चांगले दिवस आणणे हा आमचा अजेंडा आहे. चांगलं काम करण्याचा हा सरकारचा अजेंडा आहे. या ठिकाणी प्रत्येक जण काम करतोय. आमचा अजेंडा खुर्ची नाही. खुर्चीत बसवले त्यांचे प्रश्न सोडवणे हा आमचा अजेंडा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही सारे एकत्र आहोत' असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळातील फेरबदलावर भाष्य केलं.
तसंच, लाडकी बहिण योजनेमुळे सरकार अडचणीत आलंय का? असा सवाल पत्रकारांनी विचारला असता, असं काहीही नाही. एसटी महामंडळाने एकत्र बुकिंगवर ३० टक्के वाढ केली होती. त्याबद्दल मी सकाळीच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी बोललो. त्यांनी जी काही वाढ केली आहे ती रद्द करण्यास सांगितलं आहे, असं म्हणून शिंदेंनी पुढे बोलण्याचं टाळलं.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विठोबाकडे साकडं
बळीराजा, शेतकरी आणि वारकरी यांना सुखी ठेवू दे हेच विठ्ठलाकडे साकडं घातलं आहे. आषाढी एकादशीला मुखदर्शन घेतलं आज मात्र जास्त वेळ विठ्ठलासमोर बसता आलं दर्शन घेता आलं हे आपले भाग्यच आहे, असंही शिंदे यावेळी म्हणाले.
