छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात एका हॉटेलमध्ये तीन मुलांनी एका तरुणीवर सामूहिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडलाय. या घटनेनं परिसरासह शहरात एकच खळबळ उडाली आहे. मित्राला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेल्यानंतर चुकून आरोपींच्या खोलीत गेलेल्या विवाहितेला दारू पीत बसलेल्या तीन नराधमांनी आत ओढून तिला बळजबरीने बिअर पाजून तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. ही संतापजनक घटना संभाजीनगर शहरातील रेल्वेस्टेशन भागातील एका हॉटेलमध्ये रात्री 11 ते पहाटे 3 वाजेदरम्यान घडली.
advertisement
घटनेनंतर पळून गेलेल्या तिन्ही आरोपींच्या वेदांतनगर पोलिसांनी तीन तासांत मुसक्या आवळल्या. घनश्याम भाऊलाल राठोड (27), ऋषिकेश तुळशीराम चव्हाण (25, दो घेही रा. न्यू शांतिनिकेतन कॉलनी, जवाहर कॉलनी) आणि किरण लक्ष्मण राठोड (25, रा. भानुदासनगर, जवाहर कॉलनी) अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रविणा यादव यांनी दिली. 32 वर्षीय पीडिता ही विवाहित असून तिला एक बाळ आहे. पती पूर्वी काही काम करत नव्हता, सध्या तोही कामाला जातो.
पीडित महिला होती नर्स
पीडिता एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करून कुटुंबाचा उदर्निवाह करते. तिला पैशाची गरज असल्याने तिने भोकरदन येथील मित्राला पैसे मागितले होते. ते घेण्यासाठी मित्राने तिला बुधवारी भेटण्यासाठी रेल्वेस्टेशन भागातील एका हॉटेलमध्ये बोलावले होते. तिच्या मित्राने तिथे 105 क्रमांकाची रूम बुक केलेली होती. दोघांनी रात्री बराच वेळ बसून मद्यप्राशन करून नंतर जेवण केले. रात्री अकराच्या सुमारास पीडिता फोनवर बोलत हॉटेलच्या बाहेर आली होती. काही वेळात ती परत हॉटेलमध्ये गेली. मात्र तिने चुकून 105 ऐवजी खोली क्र 205 चा दरवाजा वाजवला. त्या रूममध्ये तीन जण दारू पार्टी करत बसलेले होते.
आळीपाळीने केला सामुहिक अत्याचार
पीडितेने त्यांना मित्राचे नाव घेऊन तो कुठे आहे अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी इथे नाही असे म्हटले. मात्र ती मागे फिरताच एकाने तुझा मित्र इथेच आत आहे असे सांगून तिला रूममध्ये घेतले. दार आतून लावून घेत तिला बळजबरीने बिअर पाजली. त्यानंतर तिघांनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये काय आहे?
समोर आलेल्या व्हिडीओ हा रुमच्या बाहेरचा आहे. यामध्ये तरूणी लिफ्टमधून बाहेर येते. त्यानंतर ती चुकून दुसरा दरवाजा वाजवते. दोनदा दरवाजा वाजवल्यानंतर एक तरुण दरवाजा उघडतो. चुकीचे दार वाजवल्याचे लक्षात येताच तरुणी सॉरी... सॉरी म्हणत पुढे जाते. मात्र लगेच एक तरुण बाहेर येतो आणि पुन्हा तरुणीला आवाज देतो त्याच्या हातवारे पाहता तो तरुणीला तुमचा मित्र आत असल्याचा इशारा करतोय. फोन कानाला लावलेल्या तरुणीला ही चेष्टा तिच्याच मित्राने केल्याचं वाटलं म्हणून ती पाहण्यासाठी आत गेली आणि तिथेच घात झाला. नराधमांनी तिचे लचके तोडले.
तीन तास आरोपींनी तरुणीचे तोडले लचके
पहाटे तीन ते चार वाजेदरम्यान पीडितेने आरोपींच्या तावडीतून सुटका करून घेत दरवाजा उघडून आरडाओरड केली. त्यानंतर तिने थेट वेदांतनगर पोलिस ठाणे गाठले. तोपर्यंत तिन्ही आरोपींनी हॉटेलमधून धूम ठोकली होती. पीडितेने वेदांतनगर ठाण्यात धाव घेतली. उपनिरीक्षक संगीता गिरी यांनी तिची विचारपूस केली. तिच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. तोपर्यंत पोलिस निरीक्षक प्रविणा यादव यांनी विशेष पथकाला आरोपींच्या शोधात रवाना केले.
(या सीसीटीव्हीमध्ये पीडित महिलेची ओळख पटत असल्याने तो व्हिडीओ दाखवता येणार नाही. )
