याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पनवेल, वाशी आणि बोरिवली स्टेशन्समध्ये महिलांनी विनयभंगाच्या तक्रारी नोंदवल्या आहेत. 23 ते 27 सप्टेंबरदरम्यान रेल्वे स्टेशनवर 3 आणि धावत्या लोकलमध्ये 4 विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. बोरिवली रेल्वे पोलीस स्टेशनमधील विनयभंगाचे दोन गुन्हे वगळता अन्य चार दिवसांत विनयभंगाच्या गुन्ह्यांतील आरोपीला तातडीनं अटक करण्यात आली आहे. बोरिवली प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू आहे.
advertisement
मध्य आणि पश्चिम लाईनवरील लोकलमधून दररोज 75 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. यात महिला प्रवाशांची संख्या सुमारे 20 टक्क्यांहून अधिक आहे. मात्र, कधीकाळी सर्वात सुरक्षित मानली जाणारी लोकल आता महिलांसाठी भीतीचं कारण ठरत आहे. अशा घटनांमुळे महिला प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
हेल्पलाईन वेळखाऊ
महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेची हेल्पलाईन सेवा आहे. मात्र, या हेल्पलाईनमध्ये आयव्हीआरएस प्रणाली आहे. मदत करणाऱ्या व्यक्तीशी थेट संपर्क साधण्याआधी एक दाबा, दोन दाबा अशा सूचना पाळव्या लागतात. ही प्रक्रिया वेळखाऊ आहे. त्यामुळे वेळेत मदत मिळत नाही. यामुळे आयव्हीआरएस प्रणाली बंद करून थेट हेल्पलाईन असणं गरजेचं आहे, अशी मागणी महाराष्ट्र रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या अध्यक्षांनी केली आहे.