स्थानिक पातळीवर पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचे कारण सांगून योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. दुसऱ्याच दिवशी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यात भाजपमध्ये प्रवेश केला.नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर योगेश क्षीरसागर यांनी राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीच्या विजयाचे गणित बिघडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
भाजपमध्ये प्रवेश केल्यावर योगेश क्षीरसागर काय म्हणाले?
advertisement
योगेश क्षीरसागर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नेत्या पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपमध्ये प्रवेश केला आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तयारीत होतो. भाजपाच्या कमळ या चिन्हावर आम्ही निवडणूक लढवणार आहोत.
नगराध्यक्ष पदावर योगेश क्षीरसागर म्हणाले...
बीडमध्ये नगराध्यक्ष पदाला अनुसूचित जातीचे आरक्षण आहे. त्यामुळे त्या प्रवर्गातील उमेदवार आम्ही कमळ या चिन्हावर देणार आहोत. भाजपाच्या सर्व पदाधिकारी आणि नेते यांना सोबत घेऊन त्यांची आणि आमची संघटनात्मक शक्ती एकत्र येऊन आम्ही निवडणूक लढवू, असे योगेश क्षीरसागर म्हणाले.
तिकडे त्रास होता, आता मोकळा श्वास घेतल्याची भावना
भाजपमधल्या जबाबदारीविषयी विचारले असता ते म्हणाले, बीडमध्ये प्रत्येक निवडणुकीचीच जबाबदारी आमच्यावर आहे. सध्या बीड विधानसभा क्षेत्राची जबाबदारी राहील. तिकडे काहीतरी त्रास होता. मात्र इकडे आलोय तर मोकळा श्वास घेतल्याची भावना आहे.
भाजपचा झेंडा अधिक उंच फडकावा यासाठी प्रयत्न करणार- योगेश क्षीरसागर
आगामी काळात बीड तालुक्यात भारतीय जनता पक्षाची विचारधारा दृढ करण्यासाठी, संघटन बळकट करण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी पूर्ण प्रामाणिकपणे कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त करतो. बीड तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा अधिक उंच फडकावा, यासाठी मी अखंड प्रयत्नशील राहणार आहे. बदलासाठीचा हा प्रवास अधिक मजबूत करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे आणि नागरिकांचे सहकार्य माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.
