तूर पिकासाठी विकसित करण्यात आलेली ही एआय सल्ला प्रणाली उपग्रह, हवामान बदल, मातीतील ओलावा, तापमान आणि पर्जन्यमानाचा डेटा वापरून शेतकऱ्यांना वेळोवेळी स्मार्ट सूचना देते. सिंचन केव्हा करावे, कोणत्या प्रमाणात खत द्यावे, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कसा ओळखावा तसेच काढणीची योग्य वेळ कोणती, याबाबत अचूक माहिती मिळत असल्याने उत्पादन खर्च कमी होऊन नफा वाढण्यास मदत होते.
advertisement
या प्रदर्शनात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तूर उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर सविस्तर माहिती देण्यात आली. या तंत्रज्ञानासाठी तूर पिकाचा ‘गोदावरी (BDN 2013-41)’ हा वाण वापरण्यात आला आहे. लागवड अंतर 10 बाय 2 फूट ठेवण्यात आले असून, एका झाडाला सरासरी 2450 शेंगा येतात. एका शेंगेत 4 दाणे गृहीत धरल्यास एका झाडावर सुमारे 9600 दाणे मिळतात. 100 ग्रॅम तूर दाण्यांचे वजन 13.395 ग्रॅम असून, एका झाडाचे सरासरी उत्पादन 1.28 किलो इतके आहे.
एकरी सुमारे 2222 झाडे घेतल्यास एकूण उत्पादन 28.44 क्विंटलपर्यंत पोहोचते. एआय तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे काही ठिकाणी प्रति झाड शेंगांची संख्या 2769 पर्यंत वाढल्याचेही आढळून आले आहे. एका शेंगेत 5 ते 6 दाणे मिळत असून, 100 बियांचे वजन 13.39 ग्रॅम इतके नोंदवले गेले आहे.
या पद्धतीमुळे एका झाडापासून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत असून, प्रति एकर 15 ते 16 क्विंटल उत्पादन शक्य होत असल्याची माहिती प्रसंजित कांबळे यांनी दिली. एआय आधारित कृषी तंत्रज्ञानामुळे पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड मिळत असून, भविष्यात शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता या तंत्रज्ञानात असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.





