सुरुवात कपड्यांच्या ब्रँडपासून
हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर आदेशने ठरवले की नोकरी करायची नाही. स्वतःचा व्यवसाय करायचा. सुरुवातीला त्याने एका मित्रासोबत कपड्यांचा गारमेंट ब्रँड सुरू केला. मात्र अपेक्षित यश मिळाले नाही आणि तो प्रयोग थांबवावा लागला. यानंतर व्यवसायाच्या ओढीने आदेशने स्वतःचा कॅफे सुरू केला. पण दुर्दैवाने, त्याच वेळी लॉकडाऊन लागला. हॉटेल बंद असल्याने मोठा आर्थिक तोटा झाला.
advertisement
10 हजारांत वडापावची गाडी
हार न मानता आदेशने मित्राकडून 10 हजार रुपये उधार घेतले आणि वडापावची गाडी सुरू केली. त्याची खासियत होती तंदुरी वडापाव. चवीने आणि नाविन्यामुळे ही डिश ग्राहकांच्या मनात घर करून बसली. व्यवसाय वाढवताना आदेशने मेनूमध्ये चायनीज, बर्गर, थंड पेये असे पदार्थ समाविष्ट केले. पण एक महत्त्वाचा फरक म्हणजेत्याच्या कॅफेत अजिनोमोटो नसलेले चायनीज मिळते.
बाजारातील बहुतेक ठिकाणी चायनीज पदार्थांमध्ये अजिनोमोटो वापरले जाते, ज्यामुळे चव वाढते पण आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. आदेश मात्र स्वतः मेहनत घेऊन चायनीजसाठी लागणाऱ्या चटण्या, सॉस आणि मसाले घरीच तयार करतो. हा नैसर्गिक मसाला आणि ताज्या घटकांमुळे त्याच्या पदार्थांना वेगळी आणि आरोग्यदायी चव मिळते.
वडापावची गाडी ते कॅफेपर्यंतचा प्रवास
ग्राहकांचा प्रतिसाद पाहता आदेशने वडापावची गाडी बंद करून सीझन कॅफे सुरू केला. इथे विविध पदार्थ, स्वच्छता, आरोग्यदायी रेसिपी आणि परवडणाऱ्या किंमतीत पदार्थ मिळतात.
आज आदेश महिन्याला 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत कमाई करतो. पण त्याची खरी कमाई म्हणजे ग्राहकांचा विश्वास आणि त्याच्या मेहनतीची दाद. संघर्षातून उभा राहून स्वप्न साकार करणाऱ्या आदेश गावडची ही कहाणी अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.