केंद्र सरकारच्या वतीने गरजू नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. पंतप्रधान जन-धन योजना त्यापैकीच एक असून आजपर्यंत देशातल्या कोट्यवधी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 51 कोटी नागरिकांना लाभ मिळाला आहे. सरकारने या संदर्भात मंगळवारी माहिती देताना सांगितलं की, 'पंतप्रधान जन-धन योजनेची सुमारे 20 टक्के खाती निष्क्रिय आहेत. अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात स्पष्ट केलं की 6 डिसेंबरपर्यंत एकूण 10.34 कोटी निष्क्रिय खात्यांपैकी सुमारे 4.93 कोटी खाती ही महिलांची आहेत.'
advertisement
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म `एक्स`वर लिहिलं आहे की, या योजनेच्या एकूण लाभार्थ्यांपैकी 55.5 टक्के महिला लाभार्थी आहेत. मंत्रालयाच्या माहितीनुसार, 22 नोव्हेंबरपर्यंत या खात्यांमध्ये एकूण 2.10 लाख कोटी रुपये जमा होते. मात्र या योजनेंतर्गत उघडलेल्या एकूण 4.30 कोटी खात्यांमध्ये शून्य रक्कम जमा होती. या खात्यांमध्ये किमान रक्कम ठेवणं बंधनकारक नाही, हे त्यामागचं प्रमुख कारण आहे.
अर्थ राज्यमंत्री कराड म्हणाले की, 'बँकांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, सुमारे 51.11 कोटी पीएमजेडीवाय खात्यांपैकी सुमारे 20 टक्के खाती सहा डिसेंबरपर्यंत निष्क्रिय होती. या योजनेतील निष्क्रिय खात्यांची टक्केवारी ही बँकिंग क्षेत्रातील एकूण निष्क्रिय खात्यांच्या टक्केवारी सारखीच आहे. निष्क्रिय पीएमजेडीवाय खात्यांमध्ये जमा केलेली शिल्लक अंदाजे 12,779 कोटी रुपये आहे. ही पीएमजेडीवाय खात्यांमधील एकूण जमा शिल्लक रकमेच्या अंदाजे 6.12 टक्के आहे. ही शिल्लक सक्रिय खात्यांवर लागू असलेल्या व्याजाच्या बरोबरीने व्याज मिळवणं सुरू ठेवते. खातं पुन्हा सक्रिय केल्यानंतर ठेवीदार कधीही त्यावर दावा करू शकतात तसेच पैसे काढू शकतात. बँका निष्क्रिय खात्यांची टक्केवारी कमी करण्यासाठी ठोस प्रयत्न करत आहेत. तसेच यासंदर्भात सरकारकडून नियमितपणे प्रगतीचं निरीक्षण केलं जात आहे, ' असं कराड यांनी स्पष्ट केलं.