सातारा : जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून दमदार पाऊस झाला. मागच्या 10-15 दिवसांमध्ये झालेल्या धो-धो पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. शिवाय शेती आणि शेत जमिनीचंही नुकसान झालं. जावळी, पाटण, महाबळेश्वर, वाई या तालुक्यांसह सातारच्या काही भागांमध्ये सुमारे 54 हेक्टर पीक आणि साडेनऊ हेक्टर शेतजमिनीचं नुकसान झालंय.
जर पुढे आणखी पाऊस पडला तर पिकांचं आणखी नुकसान होऊ शकतं, अशी शक्यता कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पाऊस सुरूच राहिल्यास ओढ्याकाठची, नदीकाठची जमीन वाहून जाऊ शकते, पिकांमध्ये जास्त पाणी राहिल्यास मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे यादृष्टीनं शेतकरी बांधवांनी काळजी घ्यायला हवी.
advertisement
हेही वाचा : अतिवृष्टीमुळे चारा पिकाचे नुकसान, कोरेगावातील बळीराजा हवालदिल, धक्कादायक परिस्थिती
सोयाबीनमध्ये रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तुडतुडे, करपा रोग सोयाबीनला लागू शकतात. जर ऊस पाण्याखाली राहिला तर त्याचे शेंडे कुजण्याची शक्यता आहे. भुईमुगाची आरी सुटण्याच्या वेळी जास्त पाणी असेल तर आरी कमी सुटतील आणि उत्पादन कमी होईल.
शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं?
शेतकरी बांधवांनी याबाबत सतर्क राहून ताबडतोब कृषी विभागाशी किंवा कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ज्ञांशी संपर्क साधावा. मायक्रो न्यूट्रिएंटचे डोस देऊन आणि वेळीच जैविक बुरशीनाशकांची फवारणी करून पिकांचं नुकसान आपण वाचवू शकतो, असं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी सांगितलं.





