जालना : वातावरणातील बदल, उन्हात पाऊस आणि पावसात ऊन अशी परिस्थिती असतानादेखील शेतकरी बांधव वेगवेगळे प्रयोग करून उत्पादनातून फायदा कसा मिळवायचा यावर तोडगा शोधू लागले आहेत. आता अनेक शेतकरी पारंपरिक शेती सोडून फळझाडं, फूलझाडं आणि भाजीपाला लागवडीतून चांगलं उत्पन्न मिळवतात. जालना जिल्ह्यातील दहिफळ गावचे रहिवासी दत्तात्रय काळे हेदेखील त्यापैकीच एक. त्यांनी आपल्या शेतात असाच एक प्रयोग केला आणि चक्क सोन्यासारखं उत्पादन घेतलं.
advertisement
कारलं म्हटलं की, अनेकजण नाक-तोंड मुरडतात. तर, काहीजण आवडीने कारलं खातात कारण ते आरोग्यदायी असतं. याच कडू पौष्टिक कारल्याच्या लागवडीतून दत्तात्रय काळे यांनी आतापर्यंत 2 लाखांचं उत्पन्न मिळवलंय. त्यांनी या शेतीचं नियोजन नेमकं कसं केलं, पाहूया.
हेही वाचा : दुष्काळी पट्ट्यात डाळिंबाची लागवड, शेतकऱ्यानं कमालंच केली, 2 एकर मधून घेतलं लाखो रुपयांचं उत्पन्न
दत्तात्रय यांनी युएस-33 नावाच्या कारले जातीची 1 एकर क्षेत्रात 4 बाय अडीच फुटांवर लागवड केली. त्याआधी ठिबक सिंचन आणि मल्चिंग पेपर अंथरून घेतलं. त्यामुळे पाण्याचं सूक्ष्म नियोजन करणं त्यांना शक्य झालं. खत आणि कीटकनाशकांचं योग्य नियोजन केल्याने अवघ्या अडीच महिन्यांमध्ये कारल्याचा पहिला तोडा निघाला. त्यात 3 ते 4 क्विंटल कारले निघाले. त्यानंतर मात्र उत्पन्नात भर पडली. आता दर चौथ्या दिवशी त्यांच्या शेतातून 10 क्विंटल कारले छत्रपती संभाजी नगरच्या मार्केटला जातात.
हेही वाचा : नोकरी मिळाली नाही म्हणून केली टोमॅटोची शेती, आज नोकरी करणाऱ्यांपेक्षा गडी कमावतोय जास्त पैसे
मार्केटमध्ये या कारल्यांना 35 ते 40 रुपये प्रति किलोचा भाव मिळतो. आतापर्यंत त्यांनी 8 ते 10 टन कारल्यांची विक्री केली. त्यातून त्यांना अडीच ते 3 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं असून 2 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. तसंच आणखी 2 लाखांचा निव्वळ नफा या क्षेत्रातून अपेक्षित असल्याचं दत्तात्रय काळे यांनी सांगितलं.
'खूप मोठी जोखीम घेऊन मी कारल्याच्या शेतीचा पर्याय निवडला होता. यात खर्च खूप असल्यामुळे पूर्णवेळ या शेतीला दिला, त्यामुळे चांगलं उत्पन्न मिळतंय. शिवाय शहरांमध्ये कारल्याला चांगली मागणी असल्याने दरसुद्धा व्यवस्थित मिळतोय', असं म्हणत अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न मिळत असल्याचं काळे यांनी सांगितलं.
दरम्यान, योग्य व्यवस्थापन, त्याला कष्टाची जोड आणि प्रामाणिकपणा असेल तर कोणत्याही व्यवसायात आपण यशस्वी होऊ शकतो हे दत्तात्रय काळे यांनी सिद्ध करून दाखवलं. इतर शेतकऱ्यांसाठी त्यांची ही यशोगाथा खरोखर प्रेरणादायी आहे.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा