धाराशिव : खरीप हंगामातील पिकं सध्या कोळपणीच्या अवस्थेत आहेत. यंदा चांगला पाऊस पडल्यानं पिकं जोमात आहेत मात्र काही शेतकऱ्यांकडे कोळपणीसाठी बैल नाहीत. यावर उपाय म्हणून अनेक शेतकरी सायकलच्या कोळप्यानं कोळपणी करत असल्याचं पाहायला मिळतं. एका शेतकऱ्यानं तर स्वतःकडे बैल नव्हते म्हणून कोळपे विक्रीचा व्यवसायच सुरू केला.
धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील नळी वडगाव फाटा इथल्या श्रीकांत शिकतोड यांचा हार्डवेअर आणि टायर विक्रीचा व्यवसाय आहे. अनेक वर्षांपासून ते हा व्यवसाय आणि सोबत शेतीसुद्धा करतात. परंतु शेतीच्या कामांसाठी त्यांच्याकडे बैल नसल्यानं त्यांनी 2 वर्षांपूर्वी सोयाबीन कोळपणीसाठी सायकलचे कोळपे खरेदी करायचं ठरवलं. मग एका कोळप्याची किंमत पंधराशे रुपये असल्याचं लक्षात येताच त्यांनी त्यावर बारकाईनं विचार केला आणि स्वतःच हे कोळपे तयार करून शेतकऱ्यांना स्वस्तात विकायचं ठरवलं.
advertisement
हेही वाचा : शेतीसाठी जागतिक तापमानवाढ ठरू शकते घातक; पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी दिला तोडगा
मग त्यांनी कोळपे बनवायला सुरुवात केली. 'आकाश इंजिनिअरिंग वर्क्स' या नावानं कोळपे विक्रीचा व्यवसाय सुरू केला. आता ते दिवसाकाठी तब्बल 100 ते 150 कोळपे बनवून विकतात. त्यातून त्यांना मजुरी आणि इतर खर्च वगळून 1 हजार रुपये मिळतात.
त्यांच्या या उदात्त हेतूमुळे आता शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे आणि स्वस्तात कोळपे मिळू लागले आहेत. विशेष म्हणजे अनेक शेतकरी त्यांच्याकडे कोळप्यांसाठी आधीच बुकिंग करतात. महत्त्वाचं म्हणजे 2 भावांनी शेतकऱ्यांना स्वस्तात कोळपे मिळावे या उद्देशानं स्वतःसाठीही कमी का होईना पण रोजगार निर्माण केलाय हे कौतुकास्पद आहे.