जालना : जीवनात आपण केलेले वेगवेगळे प्रयोग आपल्याला नवचैतन्य मिळवून देतात. शेतामध्ये देखील विविध प्रयोग केल्यास चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. जालना जिल्ह्यातील बोरगाव येथील शेतकरी दीपक डोके यांनी अर्धा एकर करटुले या रानभाजी पिकाची शेती करून चांगला आर्थिक फायदा मिळवलाय. बाजारात 200 रुपये प्रति किलो एवढा प्रचंड दर असलेल्या या रानभाजीच्या शेतीमधून डोके यांना दर आठवड्याला 10 ते 12 हजारांचे उत्पन्न होतंय. आतापर्यंत त्यांना 80 हजारांचे उत्पन्न झालं असून आणखी एक ते दीड लाखांचे उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे.
advertisement
करटुले रानभाजी पिकाचं कसं केलं नियोजन?
दीपक डोके हे जालना जिल्ह्यातील बोरगाव या छोट्याशा खेडेगावातील अल्पभूधारक शेतकरी शेती करून ते विवाह सोहळ्यासाठी आवश्यक असणाऱ्या मंडप डेकोरेशनचे देखील काम करतात. संभाजीनगर येथील एका शेतकऱ्याने करटुले रान भाजीची शेती यशस्वी केल्याची माहिती त्यांना मिळाली. ही शेती आपण देखील करू शकतो असा आत्मविश्वास आल्यानंतर त्यांनी संभाजीनगर येथून एका दुकानातून 10 हजार रुपये प्रति किलो या दराने करटुले बियाण्याची खरेदी केली. 1 मे रोजी पाच फूट अंतरावर बेड पाडून एका फुटावर करटुल्याची लागवड केली. यासाठी ठिबक मल्चिंग तसेच बांबू लावून वेलवर जाण्यासाठी तारांची व्यवस्था केली. यासाठी त्यांना एकूण 25 हजारांचा खर्च आला.
पॅशन फ्रुटमुळे शेतकरी मालामाल, वर्षाला एकरी 3 लाखांहून अधिक उत्पन्न, साताऱ्यातील VIDEO
करटुले शेती नवीन असल्याने गावातील अनेकांनी त्यांना तुम्ही आता फॉरेन शेतकरी झालात असे टोमणे देखील मारले. या नवीन पिकाबद्दल त्यांना काहीच माहिती नसल्याने कृषी सेवा केंद्र चालकांकडून त्यांनी मार्गदर्शन घेतले. वेगवेगळी औषधे आणि खते देऊन करटुले पिकाला जीवापाड जीव लावला. मागील महिनाभरापासून त्यांच्या शेतामधून करटुले पिकाचे उत्पन्न सुरू झालं असून सुरुवातीला 12 ते 15 हजार रुपये दर आठवड्याला यातून उत्पन्न मिळायचं. आता करटुलीचे दर काहीशी कमी झाल्याने त्यांना यातून 10 ते 12 हजार रुपये दर आठवड्याला मिळतात.
सुरुवातीला मला 210 रुपयांपर्यंत दर मिळाला आता जालना मार्केटमध्ये 130 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. एका आठवड्यात दोन तोडे होतात एका तोड्याची पाच ते साडेपाच हजार रुपये मिळतात. आतापर्यंत 80 हजार रुपयांचे उत्पन्न झाले आहे तर एकूण दीड ते दोन लाखांचे उत्पन्न होईल अशी अपेक्षा मला आहे. कुणी कितीही नाव ठेवली तरी शेतकऱ्यांनी शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग केलेच पाहिजेत असं दीपक डोके यांनी सांगितलं.