धाराशिव : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदानाची घोषणा ही अतिशय आनंदाची बाब आहे. परंतु खवाभट्टीसाठी दूधपुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना 5 रुपये प्रति लिटरनं अनुदान देण्याची मागणी खवा व्यावसायिक दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील कुंथलगिरी व भूम परिसरातील खवा, पेढा देशभरात प्रसिद्ध आहे. नुकतंच कुंथलगिरिच्या खव्याला जीआय मानांकनदेखील मिळालंय. कुंथलगिरी आणि भूम परिसरात खव्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन केलं जातं. त्यामुळे खवा बनवण्यासाठी दूधपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांनादेखील 5 रुपये प्रति लिटरनं अनुदान द्यावं, अशी मागणी खवा क्लस्टर भूमचे विनोद जोगदंड यांनी केली आहे.
advertisement
हेही वाचा : दुष्काळी स्थितीमुळे मेंढपाळांच्या जीवनात भटकंती, पोटाची खळगी भरण्यासाठीची ही संघर्षमय कहाणी!
भूम आणि कुंथलगिरी परिसरातून सरासरी 3 ते 4 लाख लिटर दुधाचं संकलन होतं. त्यातून जवळपास अडीच लाख लिटर दूध डेअरीवर वापरलं जातं, तर जवळपास दीड लाख लिटर दुधाचा खवा बनवला जातो.
या खव्याला असते देशभरातून मोठी मागणी :
धाराशिव जिल्ह्यातील कुंथलगिरी आणि भूम हा परिसर डोंगराळ भागात असल्यामुळे इथं पशूधन भरपूर आहे. त्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून इथं दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यातील काही दुधाचा खवा बनतो, तर काही दूध डेअरीवर जातं, त्यामुळे खव्यासाठी लागणाऱ्या दुधाला अनुदान देण्याच्या मागणीनं जोर धरलाय. नाहीतर शेतकरी खवाभट्टीकडे दूध आणणार नाहीत, परिणामी खवाभट्ट्या बंद पडू शकतील, असा इशाराच देण्यात आलाय.