मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर इथं मुंबई टेक वीक २०२५ चं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना आकाश अंबानी म्हणाले की, एआय हा भारताच्या आर्थिक विकासाचा एक प्रमुख चालक असेल, जो येत्या काही वर्षांत देशाला १० टक्के किंवा दुहेरी अंकी विकास दर गाठण्यास मदत करेल. एआय भारताच्या आर्थिक विकासाचे इंजिन ठरेल. यामुळे येत्या काळात १० टक्के किंवा दोन अंकी जीडीपी विकास दर साध्य होण्यास मदत होईल. कार्यक्रमादरम्यान ड्रीम११ चे सीईओ हर्ष जैन यांच्याशी झालेल्या गप्पा दरम्यान, अंबानी यांनी भविष्य घडवण्यासाठी एआयला महत्त्वाचं असल्याचं वर्णन केलं.
advertisement
"मला वाटते की AI हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा तांत्रिक बदल आहे. माझ्या मते हे असे इंजिन आहे जे भारताला नजीकच्या भविष्यात १० टक्के किंवा दुहेरी अंकी विकास दराने वाढण्यास सक्षम करेल."
"भारताला एआयमध्ये आघाडीवर बनवण्यासाठी, तीन प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. एआय पायाभूत सुविधा, संशोधन आणि विकास आणि कुशल प्रतिभा आहे. भारताच्या डिजिटल परिवर्तनासाठी जागतिक दर्जाच्या एआय पायाभूत सुविधांचा विकास आवश्यक आहे' असंही आकाश अंबानी म्हणाले.
आकाश अंबानी म्हणाले की, “आम्ही जिओमध्ये हे आधीच करत आहोत. आम्ही अलिकडेच जामनगरमध्ये घोषणा केली की आम्ही आमचे स्वतःचे एआय डेटा सेंटर बांधत आहोत जे एक गिगावॅट क्षमतेचं डेटा सेंटर असेल, परंतु पायाभूत सुविधांच्या पातळीवर गुंतवणूक सुरूच राहील.
एआय संशोधन आणि विकासात गुंतवणूक करण्याची गरज
पायाभूत सुविधांव्यतिरिक्त, अंबानी यांनी एआय संशोधन आणि विकासात गुंतवणूक करण्याची गरज यावर भर दिला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एआयच्या दृष्टिकोनाचे कौतुक केलं आणि सांगितले की, भारताला या क्षेत्रात आघाडीवर बनवण्यासाठी संशोधन आणि विकास प्रयत्नांची आवश्यकता आहे. आम्ही सखोल संशोधनात गुंतवणूक करत राहतो आणि ते संशोधन सखोल विकासाकडे घेऊन जाते आणि मग शेवटी मला वाटते की, योग्य प्रतिभेमध्ये गुंतवणूक करणे महत्वाचे आहे.”
तिसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे प्रतिभा, उच्च दर्जाच्या एआय व्यावसायिकांना आकर्षित करण्याची आणि नवीन कल्पनांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. जिओने आधीच एक मजबूत एआय टीम तयार केली आहे, ज्यामध्ये एक हजाराहून अधिक डेटा शास्त्रज्ञ, संशोधक आणि अभियंते यांचा समावेश आहे. एआयमुळे होणाऱ्या नोकऱ्यांबद्दलच्या चिंतेवरही अंबानी यांनी आपले मत व्यक्त केले. अंबानी म्हणाले की, एआयमुळे नोकऱ्या जाणार अशी चर्चा आहे पण AI आपल्या कामाच्या पद्धतीत बदल करेल'
इंटरनेटवरील एआयच्या प्रभावाची तुलना करताना अंबानी म्हणाले की, इंटरनेटच्या तांत्रिक प्रगतीमुळे, फिनटेक, ई-कॉमर्स आणि सर्जनशील अर्थव्यवस्था यासारखे नवीन क्षेत्र उद्योग म्हणून उदयास आले आहेत. मुंबई टेक वीक २०२५ ही तंत्रज्ञानाच्या जगात एक महत्त्वाची घटना आहे. या काळात, उद्योगातील दिग्गज नवोपक्रम आणि भविष्यातील शक्यतांबद्दल त्यांचे विचार मांडतात.