सेबीचा अंतिम आदेश
सेबीने आपल्या तपास अहवालात म्हटले आहे की, अर्शद वारसी त्याची पत्नी आणि भावाला शेअर बाजारात कोणत्याही प्रकारच्या ट्रेडिंगपासून एक वर्षासाठी रोखण्यात आले आहे. या सर्वांनी साधना ब्रॉडकास्ट लिमिटेड (SBL) कंपनीच्या माध्यमातून शेअर्सची किंमत बनावट पद्धतीने वाढवून नंतर ते विकले. सेबीने साधना ब्रॉडकास्ट लिमिटेडच्या (ज्याने आता आपले नाव बदलून क्रिस्टल बिझनेस सिस्टम लिमिटेड केले आहे) प्रकरणात अंतिम आदेश जारी केला आहे.
advertisement
दंड आणि वसुलीचे आदेश
सेबीने या सर्व 59 व्यक्तींवर प्रत्येकी 5 लाख रुपये दंड ठोठावला आहे. याव्यतिरिक्त सेबीने त्यांच्याकडून 'पंप अँड डंप' ट्रेडिंगमधून कमावलेले एकूण 1.05 कोटी रुपये वसूल करण्याचेही आदेश दिले आहेत. सेबीने आरोप केला आहे की, वारसी आणि इतरांनी मनीष मिश्रा नावाच्या व्यक्तीसोबत संगनमत करून SBL बद्दल खोटी सकारात्मक माहिती पसरवली आणि गुंतवणूकदारांना कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यास प्रवृत्त केले. सेबीला मिश्रा आणि वारसी यांच्यात झालेल्या व्हॉट्सअॅप चॅट्समध्ये याचे पुरावे मिळाले आहेत.
'फसवणुकीचा बळी' असल्याचा दावा
अर्शद वारसी यांना मनीष मिश्रा या शेअरमध्ये व्यापार करत असल्याचे माहीत होते. मात्र वारसी त्याची पत्नी आणि भावाने दावा केला आहे की ते शेअर बाजारात नवीन आहेत आणि त्यांना याबद्दल फारशी माहिती नाही. त्यांनी असेही म्हटले आहे की- ते मिश्राने केलेल्या कथित फसवणुकीचे बळी ठरले आहेत आणि त्याच्या निर्देशानुसार केलेल्या ट्रेडमुळे त्यांना मोठे नुकसान झाले आहे.
मिश्राच्या निर्देशानुसार वारसींचे काम
अर्शद वारसी यांनी 27 जून 2023 रोजी सेबीसमोर दिलेल्या निवेदनात म्हटले होते की- त्यांनी त्यांच्या स्वतःच्या खात्यातून ट्रेडिंग करण्याव्यतिरिक्त पत्नी आणि भावाच्या खात्यातूनही ट्रेडिंग केले होते. सेबीच्या आदेशानुसार मनीष मिश्रा आणि अर्शद वारसी यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅटवरून हे स्पष्ट झाले आहे की मनीष मिश्रा अर्शद वारसी अन् त्याची पत्नी आणि त्यांच्या भावाच्या बँक खात्यांमध्ये प्रत्येकी 25 लाख रुपये ट्रान्सफर करण्याचा प्रस्ताव देत होता.
YouTube च्या माध्यमातून फसवणूक
या प्रकरणात सेबीने सात व्यक्तींना 5 वर्षांसाठी शेअर बाजारात ट्रेडिंग करण्यापासून बंदी घातली आहे. तर 54 जणांना एका वर्षासाठी प्रतिबंधित केले आहे. SBL च्या शेअर्समध्ये 'पंप अँड डंप' सुरू होते. यात एक संघटित योजना होती. ज्यामध्ये दिशाभूल करणारे YouTube व्हिडिओ आणि बनावट ट्रेडिंगचा वापर करून शेअरची किंमत वाढवली जात होती. त्यानंतर कंपनीच्या प्रवर्तकांनी स्वतःचे शेअर्स किरकोळ गुंतवणूकदारांना विकले. YouTube वरील खोटी माहिती आणि सशुल्क मार्केटिंग मोहिमेचा वापर करून गुंतवणूकदारांना आकर्षित केले गेले.
शेअर्समध्ये हेरफेर करण्यासाठी व्हिडिओ तयार
मनीष मिश्राने त्याचे सहकारी दीपक द्विवेदी आणि विवेक चौहान यांच्यासोबत मिळून SBL च्या शेअरच्या किमतीत हेरफेर करण्यासाठी दिशाभूल करणारे YouTube व्हिडिओ तयार केले आणि त्यांचा प्रचार केला. त्यांनी कंपनीबद्दलही खोटी माहिती पसरवली. बाजार नियामकाने पाच YouTube चॅनेल ओळखले आहेत. ज्यात The Advisor, Midcap Calls, Profit Yatra, Moneywise आणि India Bullish यांचा समावेश आहे.
आरोपींनी किती पैसे कमावले?
या योजनेचा सर्वात मोठा लाभार्थी गौरव गुप्ता होता. ज्याने 18.33 कोटी रुपये कमावले आणि साधना बायो ऑईल्स प्रायव्हेट लिमिटेडने 9.41 कोटी रुपये कमावले. सेबीने व्यक्ती आणि संस्थांनी केलेल्या बेकायदेशीर नफ्याची वसुली करण्याचे आदेश दिले आहेत. याव्यतिरिक्त बाजार नियामकाने मनीष मिश्रावर 5 कोटी रुपये, गौरव गुप्ता, राकेश कुमार गुप्ता, सुभाष अग्रवाल, पीयूष अग्रवाल आणि लोकेश शाह या प्रत्येकावर 2 कोटी रुपये आणि जतिन मनुभाई शाहवर 1 कोटी रुपये दंड ठोठावला आहे.