ऐन गणेशोत्सवात ज्याची भीती होती तेच झालं. सोन्याच्या दरांनी पुन्हा एकदा नवा रेकॉर्ड नोंदवला आहे. सोन्या चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. सोन्याचे दर गौरी आगमनाआधीच 1 लाख 6 हजार रुपयांवर पोहोचल्याने गौरी पूजनाला सोनं खरेदी करायचं कसं असा प्रश्न पडला आहे. सोन्या चांदीच्या दागिन्यांचे बजेट कोलमडलं आहे. शुक्रवारी सोन्या-चांदीच्या बाजाराने पुन्हा एकदा इतिहास रचला. गुंतवणूकदार आणि सामान्य ग्राहक यांच्यासाठी ही बातमी उत्साहाची आणि चिंता वाढवणारीही ठरली आहे.
advertisement
लग्नसराई आणि सणासुदीचा हंगाम जवळ येत असताना, सोन्याच्या किंमतींनी गाठलेला नवा उच्चांक सर्वांच्या चर्चेचा विषय झाला आहे. Multi Commodity Exchange (MCX) वर सोन्याच्या कराराची किंमत शुक्रवारी प्रति 10 ग्रॅम तब्बल 1,600 रुपयांनी वाढून 1,03,760 रुपयांवर पोहोच होती. शनिवारी सकाळी सोन्याचे दर 1 लाख 5000 रुपयांवर पोहोचले. GST सह सोन्याच्या किंमती 1 लाख 6 हजार रुपयांवर आहेत. याचबरोबर चांदीच्या डिसेंबर फ्युचर्समध्येही मोठी उसळी दिसली असून, किंमत प्रति किलो 1,900 रुपयांनी वाढून ऐतिहासिक पातळीवर पोहोचली आहे.
ही वाढ केवळ भारतीय बाजारात नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारातही जाणवली आहे. American Commodity Exchange (Comex) वर सोन्याचा भाव सुमारे 34 डॉलरने वाढून प्रति औंस 3,508 डॉलरवर पोहोचला. चांदीचाही भाव 1.5 टक्क्यांनी वाढून 40 डॉलर प्रति औंस झाला. 2025 या वर्षात आतापर्यंत सोन्याच्या किमतींमध्ये जवळपास 35 टक्क्यांची वाढ झाली आहे, तर चांदीत 36 टक्क्यांहून अधिक उसळी पाहायला मिळाली आहे.
भारतीय बाजारातील वाढत्या सोन्या-चांदीच्या दरामागे रुपयाची कमजोरी हे एक महत्त्वाचे कारण ठरले आहे. शुक्रवारी रुपया 0.65 टक्क्यांनी घसरून प्रति डॉलर 88.19 या पातळीवर बंद झाला. भारत हा जगातील सर्वात मोठा सोन्याचा खरेदीदार असल्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्यावर थेट परिणाम किंमतींवर होतो. सोन्या-चांदीच्या या उसळीने बाजारातील गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढवला असला, तरी सामान्य ग्राहकांसाठी ही परिस्थिती चिंतेची आहे.
लग्न आणि सणांच्या तयारीत असलेल्या कुटुंबांसाठी हे दर धक्का देणारे आहेत. सोन्याच्या पारंपरिक दागिन्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या भारतीय घरांमध्ये सोनं आता गुंतवणुकीचं साधन राहिलं असलं, तरी भाव वाढल्यामुळे खरेदीची योजना पुढे ढकलण्याची वेळ अनेकांवर आली आहे.
LKP Securities चे Commodity आणि Currency विश्लेषक जतिन त्रिवेदी यांचं मत आहे की, "रुपयाच्या कमजोरीमुळे MCX वर सोन्याच्या भावाला बळकटी मिळाली आहे. अमेरिका-भारत व्यापार शुल्क आणि जागतिक राजकीय अनिश्चिततेमुळे सोन्याच्या किंमती उच्च पातळीवर आहेत. पुढील काही दिवसांत सोन्याच्या किंमती 1,00,000 ते 1,05,000 रुपयांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे."