सध्याच्या काळात सोन्याचा लहानसा तुकडा देखील फार महत्त्वाचा आणि मौल्यवान मानला जात आहे. कारण, सोन्याचे साठे मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहेत. 2023च्या शेवटापर्यंत एकूण 212,582 टन सोन्याचं उत्खनन करण्यात आलं आहे. येत्या 20 वर्षांत विद्यमान तंत्रज्ञानाच्या मदतीने आणखी 244,040 टन सोनं जमिनीतून बाहेर काढलं जाऊ शकतं. सोन्याची कमतरता आणि मर्यादित प्रमाण यामुळे ते अधिक मौल्यवान ठरत आहे. यामुळेच या वर्षी सोन्याचा भाव प्रति औंस अंदाजे 2,800 डॉलर्सवर पोहोचला आहे. अशा स्थितीत जर प्रयोगशाळेत सोन्याची निर्मिती झाली किंवा त्याचे इतर स्रोत सापडले तर त्याचं मूल्य आणि महत्त्व टिकून राहील का? असा प्रश्न आहे.
advertisement
महासागरांचे तळ आणि अंतराळात सोनं असण्याची शक्यता
ज्याप्रमाणे जमिनीखाली सोन्याचे साठे सापडतात त्याचप्रमाणे महासागरांच्या तळाशी देखील सोन्याचे साठे आहेत. पण, कमी प्रमाणात आहेत. पाण्यातून सोनं वर काढणं आणि त्यावर प्रक्रिया करणं सहज शक्य नाही. अलीकडेच काही अंतराळवीरांनी पृथ्वीजवळील लघुग्रहांवर सोनं आणि इतर धातू असण्याची शक्यता वर्तवली आहे. पण, या लघुग्रहांवरून सोनं काढणं आणि ते पृथ्वीवर आणणं, ही गोष्ट सध्या कल्पनाच आहे. कारण, अंतराळ मोहिमांचा खर्च खूप जास्त असतो.
सोन्याच्या निर्मितीचं शास्त्र
सोने हा एक केमिकल एलिमेंट आहे. त्याच्या अणू केंद्रकांमध्ये 79 प्रोटॉन्स असतात. सैद्धांतिकदृष्ट्या, पाऱ्यामधून एक प्रोटॉन काढून किंवा प्लॅटिनममध्ये एक प्रोटॉन जोडून त्याचं सोन्यात रूपांतर करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. पण, या प्रक्रियेसाठी भरपूर ऊर्जा आणि खर्च लागतो. शिवाय त्यातून मिळणाऱ्या सोन्याचं प्रमाण फार कमी आहे. दरम्यान, केमिकल रिॲक्शन्स, बॅक्टेरिया स्ट्रेन आणि लेझर लाइट्स वापर यांसारख्या इतर पद्धतींचा वापर करून सोन्याची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, यापैकी कोणतीही पद्धत अद्याप पूर्णपणे प्रभावी, स्वस्त किंवा स्केलेबल असल्याचं सिद्ध झालेलं नाही. तसेच, सोन्यात अशुद्धता असेल तर त्यानुसार त्याचं मूल्य कमी होईल.
सांस्कृतिक आणि आर्थिक मुल्यात बदल होईल का?
हजारो वर्षांपासून सोन्याला मौल्यवान धातूचा दर्जा आहे. ते फक्त संपत्ती आणि सधनचेचं प्रतीक नसून त्याला धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही महत्त्व आहे. राजांचे मुकुट, धार्मिक स्थळे आणि बँकांमध्ये अनेक वेळा साठवलं गेलं आहे. आजही, डिजिटल गोल्ड, म्युच्युअल फंड आणि एक्स्चेंज ट्रेडेड फंडच्या रूपात गुंतवणुकीसाठी सोन्याचा वापर केला जातो. इलेक्ट्रॉनिक्स, दंतचिकित्सा, संरक्षण आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातही सोन्याचा वापर केला जातो. कारण, हा धातू चांगला वाहक आहे आणि सहजासहजी खराब होत नाही.
प्रयोगशाळेत बनवलेलं सोने हे खाणकाम केलेल्या सोन्याइतके मौल्यवान मानलं जाईल का? अशा सोन्याला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व दिलं जाईल का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. भविष्यात समाज प्रयोगशाळेत निर्मिती झालेल्या सोन्याचा स्वीकार कशा प्रकारे करेल, हे बघणे रंजक ठरेल.