बालपणापासून आजपर्यंत नोटांचे विविध आकार, रंग आणि मूल्य तुम्ही बदलताना पाहिलं असेल. एक काळ होता जेव्हा अगदी 1, 2 आणि 5 रुपयांचीही नोट होती. आता त्यांची नाणीच असतात. 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या नोटेनेही आपलं रंगरूप बदललंय. तुम्हाला माहितीये का, की भारतात हे कागदी किंवा छापील चलन अगदी अलीकडेच म्हणजे गेल्या 150 वर्षातच दाखल झालंय. त्यापूर्वी फक्त नाण्यांच्या स्वरूपातच भारतीय चलन अस्तित्वात होतं.
advertisement
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, 18व्या शतकाच्या शेवटी भारतात कागदी चलन म्हणजेच नोटा वापरण्यास सुरुवात झाली. त्या वेळी भारतावर इंग्रजांचं राज्य होतं. पहिली भारतीय नोट भारत सरकारने काढली होती. त्यानंतर 1938 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हे काम आपल्या हाती घेतलं. 18व्या शतकात बंगालमध्ये बँक ऑफ हिंदुस्तान जनरल बॅंक आणि बंगाल बॅंकेने भारतात कागदी चलन आणलं. 1861 मध्ये पेपर करन्सी ॲक्ट आला आणि कागदी चलन ही जबाबदारी मिंट मास्टर, महालेखाकार आणि करन्सी मॅनेजर यांच्यावर सोपवण्यात आली. भारत सरकारने 1861मध्ये पहिली दहा रुपयांची नोट आणली. त्यानंतर 1872मध्ये 5 रुपयांची नोट आली. 1899मध्ये 10,000 रुपयांची नोटही येऊन गेली. 1900मध्ये 100 रुपयांची नोट आली. 1905मध्ये 50 रुपयांची नोट आली. 1907मध्ये 500 रुपयांची नोट आली. 1909मध्ये 1000 रुपयांची नोट आली. 1917मध्ये 1 रुपयाची आणि 2.5 रुपयांची नोटही आली. अर्थात काळाबरोबर त्यातल्या किती तरी नोटा पुढे बंदही झाल्या.
वाचा - एक जानेवारीपासून वर्षच नाही तर 'हे' नियम देखील बदलणार; चेक करा नव्या नियमांची यादी एका क्लिकवर
भारतीय रिझर्व्ह बँकेने 1938मध्ये भारतीय चलनी नोटा बाजारात आणल्या. पाच रुपयांच्या नोटेवर सहाव्या जॉर्जचा फोटो होता. 1899मध्ये काढण्यात आलेली दहा हजार रुपयांची नोट 1946मध्ये मागे घेण्यात आली. 1949मध्ये 5000 रुपयांची नोट आली. ती 1978मध्ये बंद करण्यात आली.
1996मध्ये 10 आणि 500 रुपयांच्या नोटांवर महात्मा गांधी यांचा फोटो आला. त्यानंतर लायन कॅपिटल सीरिजमधल्या नोटा बदलण्यात आल्या. सध्या वापरात असलेल्या चलनी नोटांना महात्मा गांधी सीरिजच्या नोटा असं म्हटलं जातं. 1996पूर्वी सगळ्या नोटांवर गांधीजींचा चेहरा नव्हता. अशोक स्तंभ, तंजावरचं मंदिर, इंडिया गेट, बंगाल टायगर अशा विविध गोष्टींची चित्रं तेव्हा नोटांवर होती.