फसव्या लिंकने साधला संपर्क
सायबर गुन्हेगारांनी एका महिला प्राध्यापकाची तब्बल २३ लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली. सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या प्रकारांवर ही घटना गंभीर इशारा देणारी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी इंस्टाग्रामवरील एका फसव्या लिंकद्वारे या महिला लेक्चररशी संपर्क साधला. त्यानंतर तिला मोठा नफा मिळवून देणाऱ्या एका बनावट ऑनलाइन गुंतवणूक गटात सामील करून घेतले. सुरुवातीला मोठा नफा होईल, असे आमिष दाखवून आरोपींनी तिचा विश्वास मिळवला.
advertisement
नफा मागताच आरोपींनी टाकला दबाव
विश्वास बसल्यानंतर, आरोपींनी तिला विविध बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम गुंतवण्यास भाग पाडले. महिला लेक्चररने मोठ्या नफ्याच्या आशेने एकूण २३ लाख रुपये गुंतवले. मात्र, तिने जेव्हा गुंतवलेल्या रकमेचा आणि नफ्याचा परतावा (Profit) मागितला, तेव्हा आरोपींनी परतावा देण्याऐवजी अधिक गुंतवणूक करण्यासाठी दबाव टाकला.
फसवणूक लक्षात येताच पोलिसांत धाव
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित महिला लेक्चररने तत्काळ सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक लामतुरे यांनी या घटनेची माहिती दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन
सायबर पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. अज्ञात लिंक, अविश्वसनीय गुंतवणूक योजना आणि तात्काळ गुंतवणुकीचा दबाव अशा गोष्टींपासून नागरिकांनी अत्यंत सावध राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. मोठी रक्कम गुंतवण्यापूर्वी त्या योजनेची सत्यता पडताळून पाहणे आवश्यक आहे.