शासनाकडून शेतकऱ्यांसाठी 'महाविस्तार एआय' अॅप सुरू, कोणते फायदे मिळणार?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : बदलत्या हवामान परिस्थिती, बाजारातील चढउतार आणि माहितीच्या अभावामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या समस्या सोडवण्यासाठी कृषी विभागाने तंत्रज्ञानाच्या मदतीने एक नवा उपक्रम हाती घेतला आहे.
सोलापूर : बदलत्या हवामान परिस्थिती, बाजारातील चढउतार आणि माहितीच्या अभावामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या समस्या सोडवण्यासाठी कृषी विभागाने तंत्रज्ञानाच्या मदतीने एक नवा उपक्रम हाती घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेले अत्याधुनिक ‘महाविस्तार एआय’ (Mahavistar AI) हे अॅप आता शेतकऱ्यांच्या डिजिटल सहाय्यकाच्या भूमिकेत दिसणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित हे अॅप शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित सर्व माहिती, सल्ला आणि सेवा एका ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे.
अॅपचे वैशिष्ट्ये काय?
महत्त्वाचे म्हणजे हे अॅप पूर्णपणे मराठी भाषेत उपलब्ध असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना ते सहज वापरता येईल. अॅपमध्ये समाविष्ट असलेल्या ‘एआय चॅटबॉट’ सुविधेमुळे शेतकऱ्यांचे प्रश्न तत्काळ सोडवले जातात. हवामान अंदाज, बाजारभाव, पिकांचे मार्गदर्शन आणि सरकारी योजनांची माहिती हे सर्व काही एका क्लिकवर मिळणार आहे.
रिअल-टाइम हवामान अंदाज या अॅपचे खास वैशिष्ट्य आहे. यामुळे शेतकरी पेरणी, सिंचन, खतांचा वापर आणि कापणीचे नियोजन अचूकपणे करू शकतात. स्थानिक आणि राष्ट्रीय बाजारातील पिकांचे दर सतत अपडेट होत राहतात, त्यामुळे शेतकरी योग्य वेळी आपले उत्पादन विकून अधिक नफा मिळवू शकतात.
advertisement
कृषी विभागाच्या विविध योजना, अनुदान आणि विमा योजनांचे तपशील देखील या अॅपमधून सहज पाहता येतात. यामुळे शेतकऱ्यांना कार्यालयांच्या फेरफटक्यांपासून मुक्तता मिळेल आणि सर्व माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध होईल.
सोलापूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी सांगितले, “महाविस्तार एआय अॅप शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल क्रांती ठरणार आहे. शेतीसंबंधी सर्व माहिती, बाजारभाव आणि हवामान अंदाजामुळे शेतकरी योग्य वेळी पिकांची विक्री व नियोजन करू शकतो. त्यामुळे उत्पन्नात निश्चितच वाढ होईल. हे अॅप घ्या आणि शेतीत डिजिटल परिवर्तनाचा भाग बना.”
advertisement
शेतकऱ्यांच्या सोयीसाठी अॅपमध्ये व्हिडिओ मार्गदर्शन सुद्धा देण्यात आले आहे. या मराठी व्हिडिओंमधून पिकांची लागवड, खतांचा वापर, कापणी, सेंद्रिय शेती आणि रोग नियंत्रण याबाबत सविस्तर माहिती मिळते.
पिकांवरील रोगांचे होणार निदान
सर्वात उल्लेखनीय म्हणजे, या अॅपमध्ये ‘एआय पिक निदान’ (AI Crop Diagnosis) सुविधा आहे. शेतकरी आपल्या पिकांचा फोटो अपलोड केल्यास, कृत्रिम बुद्धिमत्ता त्या पिकांवरील रोग, किडी किंवा पोषणअभावाचे कारण ओळखते आणि त्यावर त्वरित उपाय सुचवते. त्यामुळे चुकीच्या कीटकनाशकांचा किंवा खतांचा वापर टाळता येतो, आणि उत्पादन खर्चात बचत होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 09, 2025 7:42 AM IST