ट्विटरचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पराग अग्रवाल यांनी 2022 मध्ये राजीनामा दिला. आता ते आर्टिफिशियल इंटिलिजन्सशी संबंधित एका स्टार्टअपवर काम करत आहेत. त्यासाठी त्यांनी सुमारे 250 कोटी रुपयांचं फंडिंगही मिळवलं आहे. 2022 मध्ये प्रसिद्ध अमेरिकी अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेतलं. त्यानंतर ‘कॅास्ट कटिंग’ च्या नावाखाली त्यांनी अनेक कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं. यात अनेक वरिष्ठांचाही समावेश होता.
advertisement
मस्क यांच्या या निर्णयावर त्यावेळी टीकेची झोड उठवण्यात आली होती. पराग अग्रवालसह काही अधिकाऱ्यांना मोठी नुकसानभरपाई देण्याचं मस्क यांनी कबूल केलं होतं, मात्र नंतर त्यांनी हात वर केले. सेव्हरन्स पॅकेज म्हणून पराग यांना सहा कोटी अमेरिकन डॉलर मिळणार होते मात्र प्रत्यक्षात काहीही मिळालं नाही. म्हणूनच त्यांच्यासह चौघांनी 12.8 कोटी डॉलर न मिळाल्याप्रकरणी मस्क यांच्या विरोधात कोर्टात धाव घेतली आहे.
पराग हे मूळचे अजमेरचे आहेत. त्यांचे वडिल इंडियन न्युक्लिअर एनर्जी डिपार्टमेंटमध्ये ज्येष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांची आई निवृत्त प्रोफेसर आहे. त्यांची पत्नी विनिता एका व्हेंचर कॅपिटल फर्ममध्ये पार्टनर असून या दाम्पत्याला दोन मुलं आहेत. पराग 2005 मध्ये आयआयटी बॉम्बेमधून उत्तीर्ण झाले. त्यानंतर पीएचडी करण्यासाठी ते अमेरिकेतील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत गेले. पीएचडी पूर्ण झाल्यानंतर अमेरिकेतच त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली.
‘मायक्रोसॅाफ्ट रिसर्च’ आणि ‘याहू’ सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये त्यांनी इंटर्नशिप केली. सुमारे सहा वर्षं ट्विटरमध्ये काम केल्यानंतर त्यांची चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली. त्यांच्या करिअरमधील हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता. एलन मस्क यांना कोर्टात खेचल्यामुळे पराग यांचं नाव सध्या चांगलंच चर्चेत आहे.