राधानगरी येथील छोटया गावातीलधनपाल निल्ले यांची कनिष्ठ कन्या "उषा" अगदी लाडात वाढलेल्या. दोन भाऊ व एक बहिण घरात मुला मुलींना समानतेची वागणूक आई शांताबाईने उत्तम संस्कार आणि वडिलांचे संस्कारीत आधुनिक विचार यांची कास धरुन वाढलेली ही मुलगी जेवढी हट्टी तेवढीच जिद्दी. घरात वडिलांचा शेती व्यवसाय. एक भाऊ राजकारणात तर एक भाऊ व्यवसायात. हातात बैलांचा दोर धरुन मजेत बैलगाडी शेतावर घेवून जाणारी ही मुलगी.
advertisement
असे तयार झाले उषा मसाले!
वयाच्या १८ व्या वर्षी निपाणी येथील तंबाखूचे व्यापारी स्व.आप्पासाहेब जबाप्पा आवटे यांचे कनिष्ठ सुपुत्र प्रकाश आवटे यांच्याशी विवाह झाला. एकत्र कुटुंबातून वेगळे झाल्यावर स्वतःचा व्यवसाय म्हणून प्रकाश आवटे व उषा आवटे यांनी किराणा दुकान सुरू केलं. इतकंच करुन मन समाधानी नव्हतं. आर्थिक अडचण आणि काहीतरी वेगळं करण्याची जिद्द स्थिर बसू देत नव्हती. प्रकाश आवटेंच्या सल्ल्यानुसार घरगुती पद्धतीने वेगवेगळया प्रकारचे मसाले करुन लोकल हॉटेल आणि दुकानांना माल पुरविला. लोकांच्या आवडींना मान्यता देऊन त्यात बदल घडविले. यात प्रकाश आवटेंनी उषा उषा यांना पूर्ण सहकार्य केलं आणि उषा वहिनीनी मसाले हा व्यवसाय नावा रुपाला आणला.
१९८१-८२ साली प्रायोगिक तत्त्वावर कोकण भाग मसाल्यांच्या व्यवसायासाठी निवडला. इथं त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. कोकणात येऊन लोकांच्या चुलीपर्यंत जाऊन स्थानिक गृहिणीशी संवाद साधून कोकणी पद्धतीचे मसालेही बनविले. सुरवातीला प्रकाश आवटे कोकणात एस.टी.ने मसाले घेऊन येत. नंतर भाड्याच्या गाडीने, कधी कधी माल कमी पडला तर उषा या सुद्धा देखील मसाले एस.टी. बसने घेऊन जात होत्या. तेव्हा त्यांची मुलं लहान होती. धंद्याची गरज पाहून त्यांनी टेम्पो विकत घेतला. निपाणीहून टेम्पोने माल पुरवला जाऊ लागला. प्रकाश आवटे जेव्हा मसाले सप्लाय करायला कोकणात येत तेव्हा सुरुवातीला चालू केलेले किराणा दुकान तसेच चार मुलांची जबाबदारी सांभाळून उषा आवटे मसाल्याचे प्रॉडक्शन करत.
प्रकाश आवटे यांचं निधन
कोकणात जम बसल्यावर १९९३ साली त्यांनी कणकवलीतील हुंबरठ इथं भाडे तत्वावर जागा घेवून मसाला फॅक्टरी चालू केली. १९९७ साली उषा यांना 'बिझनेस एक्सप्रेस' हा पुरस्कार मिळाला. १९९९ साली जानवली इथं जागा घेवून स्वतःच्या जागेत फॅक्टरी सुरू केली. या सर्व कार्यात प्रकाश आवटे यांनी उषा यांना चांगली साथ दिली. याच काळात एक अत्यंत वाईट घटना घडली. २८ नोव्हेंबर १९९९ साली प्रकाश आवटे यांचे हार्ट अटॅकने निधन झालं. उषा आणि त्यांच्या कुटुंबावर हा मोठा आघात होता. पण त्यातून उषा आवटेंनी स्वतःला सावरलं. कारण 'उषा वहिनी मसाले प्रॉडक्शन' हे उषा आणि प्रकाश आवटे या दोघांनी मिळून पाहिलेलं स्वप्न होतं. आणि ते त्यांना साकारायचं होतं. प्रकाश आवटे गेल्यावर सुरुवातीपासूनच या व्यवसायात असलेली त्यांची दोन्ही मुले आकाश आणि अमित यांनी आपल्या वडिलांची उणीव भरुन काढली. २००० साली 'अरिहंत पुरस्कार' मिळाला. उषा आवटेंनी जिद्दीने आणि ध्येयाने आपला कारभार सांभाळला.
मार्केटमधील मागणीनुसार, बदल घडवून आणला. सन २००४ साली महाराष्ट्र राज्य जिल्हा उद्योग पुरस्कार आणि सन २००५ साली महाराष्ट्र गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आलं. तसंच 'महिला उद्योजक राज्य परिषदच्या कार्यकारिणी सदस्य म्हणून काम पाहतात. या सर्व कार्यात व्यापारी बंधू आणिव हितचिंतक यांचे नेहमी सहकार्य मिळत आहे. शुन्यातून विश्व निर्माण करणारी उषा वहिनीने आपण आणि आपल्या पतीने पाहिलेल्या स्वप्नपूर्तीस आकार देत यशाची घोडदौड चालू ठेवली आहे.