पुनर्बांधणी आणि प्रकल्पाची पार्श्वभूमी
भायखळ्यातील जुना रोड ओव्हरब्रिज (ROB) वापरण्यास अयोग्य ठरल्याने तो पाडून त्या ठिकाणी नव्या आणि आधुनिक केबल-स्टे प्रकारच्या पुलाचं बांधकाम सुरू करण्यात आलं आहे. सुमारे ₹287 कोटी खर्चाच्या या प्रकल्पाचं काम महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ (महारेल)मार्फत सुरू आहे. मुळात हे काम 2024 मध्ये पूर्ण होणार होतं, मात्र काही तांत्रिक कारणांमुळे ते पुढे ढकलावं लागलं. त्यानंतर मुदत 2025 पर्यंत वाढवण्यात आली आणि अखेरीस आता हा पूल मार्च 2026 पर्यंत सर्वसामान्यांसाठी खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
कामाची सद्यस्थिती
ऑक्टोबरच्या सुरुवातीला या पुलाचं सुमारे 72 टक्के काम पूर्ण झालं होतं, परंतु काही कारणांमुळे काम काही काळ थांबलं. त्यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की उर्वरित कामासाठी सुमारे पाच महिन्यांचा कालावधी लागेल. मात्र, आता परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. ऑक्टोबरच्या अखेरीसच काम 80 टक्क्यांपर्यंत पूर्ण झालं आहे, असं महारेलच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. म्हणजेच प्रकल्प पुन्हा गती पकडत असून उड्डाणपूल लवकरच पूर्णत्वास जाण्याची चिन्हं आहेत.
नवा उड्डाणपूल 916 मीटर लांबीचा आणि चार लेनचा असेल, म्हणजे जुन्या पुलाच्या दुप्पट क्षमतेचा. हा पूल पूर्वेकडील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेपासून दक्षिण मुंबई, दादर आणि सीएसएमटीपर्यंत थेट जोडणी साधेल. यामुळे वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल. केबल-स्टे डिझाइनमुळे हा पूल केवळ कार्यक्षमच नव्हे तर दिसायलाही आकर्षक असेल.
वाहतूक व्यवस्थेवर परिणाम
या पुलाचं बांधकाम अत्यंत तांत्रिक आणि आव्हानात्मक आहे. कारण हा पूल घनदाट बाजारपेठ आणि रेल्वे रेषांवरून जातो. त्यामुळे अभियंत्यांना नियोजन करताना विशेष काळजी घ्यावी लागली. पुलाचा मुख्य पायलॉन म्हणजेच संपूर्ण रचनेचा आधारस्तंभ पूर्ण झाला आहे, तर केबल-स्टे भागासाठी केबल बसवण्याचं काम सुरू आहे. डेक स्लॅब टाकण्यात आला असून, त्यावर अंतिम पृष्ठभागाचं काम सुरू आहे. या कामाचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते सुरू असतानाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील वाहतूक पूर्णपणे थांबवावी लागली नाही. दररोज हजारो वाहनं या मार्गावरून जात असतानाही काम नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यात आलं आहे. त्यामुळे नागरिकांच्या हालचालींवर फारसा परिणाम झाला नाही.
आधुनिक वैशिष्ट्यं
या पुलात अनेक आधुनिक सुविधा देण्यात येत आहेत. पुलाच्या क्रॅश बॅरिअरमध्ये तीन-स्तरीय युटिलिटी डक्ट तयार करण्यात आला आहे, ज्यामध्ये विद्युत आणि टेलिकॉम केबल्स सुरक्षितरीत्या बसवता येतील. तसेच संपूर्ण पुलावर तिरंगी एलईडी लाईटिंग बसवण्यात येणार आहे, जी राष्ट्रीय कार्यक्रम किंवा सणांच्या वेळी प्रकाशित केली जाईल. पुलावर सेल्फी पॉईंट आणि फसाड लाईटिंगसुद्धा असेल, ज्यामुळे हा पूल मुंबईच्या स्कायलाइनमधील एक नवं आकर्षण ठरेल.






