मुंबई : राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये पावसाने खंडदेखील दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोकणातील सर्व जिल्हे, मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. पण मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पुढील 24 तासांसाठी देखील हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 25 जुलै रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील, हे जाणून घेऊयात.
advertisement
मुंबईत मागील 24 तासात बहुतेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर पुढील 24 तासांसाठी मुंबईत बहुतेक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर मुंबईत कमाल तापमान 28°c तर किमान तापमान 24°c एवढा असणार आहे. यासोबतच कोकण विभागातील पालघर आणि रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट तर उर्वरित जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
पुढील 24 तासात उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर हा अधिक असणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर अहमदनगर आणि जळगाव या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट तर कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. याठिकाणी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस देखील होऊ शकतो, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
एकंदरीत पुढील 24 तास राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार असून कोकण आणि मध्य महाराष्ट्र तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर हा अधिक असणार आहे. मात्र मराठवाड्यातील अनेक जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.