मध्य रेल्वेने घेतलेल्या या निर्णयाचा मुख्य फायदा हा लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनसमोर घडणाऱ्या अपघातांची नेमकी कारणे समजावीत यासाठी आहे. मोटरमन केबिनच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास सुरुवात करण्यात आली असून यामुळे अपघातांचे योग्य माहिती मिळणे शक्य होणार आहे.
प्रत्येक हालचाल आता कॅमेऱ्यात होणार कैद
मध्य रेल्वेच्या ताफ्यातील एकूण 161 लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे सुरु करण्यात आले आहेत. बाकी लोकल गाड्यांमध्येही हे कॅमेरे बसवण्याचे काम सध्या सुरू आहे. लवकरच सर्व लोकल गाड्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध होणार आहे. रेल्वे माहिती अधिकार कार्यकर्ते समीर झवेरी यांनी मोटरमन केबिनबाहेरील सीसीटीव्ही प्रकल्पाबाबत माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागवली होती. त्यातून हा निर्णय समोर आला आहे.
advertisement
अनेक लोकल मार्गावरील घटना
सध्या रेल्वे रुळांवर होणाऱ्या आत्महत्या, रुळांवरील अडथळे किंवा लोकलचा समोरून होणारा अपघात यांची चौकशी करताना मोटरमनचा जबाब आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब हेच मुख्य पुरावे असतात. मात्र अनेक वेळा या जबाबांमध्ये फरक दिसून येतो. त्यामुळे अपघाताचे खरे कारण ठरवणे कठीण होते.
यामुळे सीसीटीव्ही बसवणे गरजेचे ठरले
ही समस्या दूर करण्यासाठी मोटरमन केबिनबाहेर रेल्वे रुळ आणि आजूबाजूचा परिसर कव्हर करणारे उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कॅमेऱ्यांच्या मदतीने अपघातांचा व्हिडिओ पुरावा उपलब्ध होईल ज्यामुळे चौकशी अधिक पारदर्शक आणि अचूक होण्यास मदत होणार आहे.
