जीएसटी वापरून स्वतःचे खिसे भरले
मित्राच्या नावावर उघडलेल्या जीएसटी खात्याचा गैरवापर करून मोठ्या आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी लखनऊ येथील चार्टर्ड अकाउंटंट रशीद रईस सिद्दीकी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गैरव्यवहारामुळे एका व्यक्तीवर तब्बल 4.69 कोटी रुपयांची कर भरण्याची जबाबदारी पडली.
आरोपीशी ओळख कशी झाली?
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रार दार नसीर हुसेन शेख (वय 36) हे बीकेसीतील एका खासगी कंपनीत आयटी सपोर्ट एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतात. ते ट्रॉम्बेतील चिता कॅम्प परिसरात राहतात शिवाय त्यांचे एक मोबाईल दुकान असून ते त्यांचे भाऊ चालवतात.
2018 मध्ये नसीर यांनी ऑनलाइन मोबाईल विक्रीसाठी एक ई-कॉमर्स वेबसाइट सुरू करण्याचा विचार केला होता. यासाठी जीएसटी नोंदणी आवश्यक असल्याने त्यांनी एका ओळखीच्या असलेल्या रशीद सिद्दीकीकडे मदत मागितली. सिद्दीकीने स्वतः चार्टर्ड अकाउंटंट असल्याचे सांगून जीएसटी नोंदणी करून देण्याची तयारी दर्शवली.
परंतू मार्च 2018 मध्ये आवश्यक कागदपत्रे घेतल्यानंतर सिद्दीकीने जीएसटी खाते उघडल्याचे सांगितले. मात्र नसीर यांचा ऑनलाइन व्यवसाय सुरूच झाला नाही. व्यवहार नसल्याने त्यांनी जीएसटी खाते बंद करण्याचा निर्णय घेतला. यासाठी सिद्दीकीने पैसे घेतले मात्र खाते बंद केल्याचा कोणताही पुरावा दिला नाही.
अखेर पडदा उठला
फेब्रुवारी 2020 मध्ये जीएसटी विभागाकडून नसीर यांना थकीत रकमेची नोटीस मिळाली. पुढील तपासात कोणतेही व्यवहार आढळले नसतानाही 2024 मध्ये त्यांच्यावर 4.69 कोटी रुपयांचा दंड लावण्यात आला. अखेर फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नसीर यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
