घडलं काय?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, या शाह नगरसेविका एका व्यक्तीच्या दुकानाबाहेर उभ्या आहेत मात्र काही वेळानंतर त्याच दुकानात नगरसेविका जबरदस्तीने शिरताना दिसत असून दुकानातील सर्व माल बाहेर फेकत आहेत. सर्व प्रकार दुकानाबाहेर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला आहे. ही घटना पाहून अनेकांनी नाराजीही व्यक्त केलेली आहे.
यातील एक संतापजनक बाब म्हणजे त्या दुकानात एक मंदिरही आहे. तरीही असे असताना त्या नगरसेविका आणि त्यांच्या सोबत असलेले काहीजण त्या दुकानात चपल घालून प्रवेश करतात. याच गोष्टीमुळे धार्मिक भावना दुखावल्याचाही आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
advertisement
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ती दुकानाची जागा ही खाजगी मालमत्ता असल्याचे सांगितले होते शिवाय त्याजागी हस्तक्षेपही न करण्याचे स्पष्ट सांगितले होते. असे असताना देखील स्वत:च नगरसेविकेने त्या दुकानात जाऊन प्रवेश केला आणि दुकानातील माल रस्त्यावर फेकायला सुरुवात केली.
धमक्याही दिल्या गेल्या
या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओने मोठा वाद निर्माण झाला असून पीडीत व्यक्तीला त्या जागेवर कायदेशीर हक्क असल्याचा दावा करण्यात येत असून त्याला दोन दिवसांपासून धमक्याही दिल्या जात असल्याचे समोर येत आहे.
या दरम्यान या सर्व प्रकारावर भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही तसेच व्हायरल होत असलेला व्हिडिओ हाच पुरावा असूनही आपल्याच पक्षाच्या नगरसेवकाविरुद्ध कोणतीही कारवाई न करणाऱ्या या भाजप उपाध्यायांवर नागरिकांनी अधिक नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय अनेकांनी या घटनेप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नगरसेविकेने केला या प्रकरणाचा खुलासा
बोरिवली पश्चिम येथील वॉर्ड क्रमांक 15 मधील भाजप नगरसेविका जिज्ञासा निकुंज शाह यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांनी स्वतःचा एक व्हिडिओ जारी करून या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.
ज्यात त्या म्हणतात,''ज्या दुकानातील व्हिडिओ व्हायरल झाला त्याच परिसरात असलेल्या अधिकाऱ्यांनी तसेच काही दुकानदारांनी तक्रार केली. त्या संबंधित ठिकाणी मंदिर असून त्या ठिकाणी व्यवसाय करतात. ही सर्व माहिती मिळाल्यानंतर नगरसेविका या त्या ठिकाणी पोलिस आणि बीएमसी अधिकाऱ्यांसह गेल्या
सुरुवातीस त्या दुकानदाराने तिथे कपड्यांचा व्यवसाय चालत असल्याचे सांगितले.पण आतमध्ये एक मंदिर असल्याचे त्याने आधी सांगितले नाही. मंदिराला कुलूप लावून व्यवसाय सुरू असल्याचे पाहून त्यांनी दरवाजा उघडण्यास सांगितले, पण दुकानदार टाळाटाळ करत होता असा दावा त्यांनी केला. या कारणामुळे संबंधित जागा खाली करण्यात आली. सुरुवातीला दुकानदाराला समज देऊन दुकान सोडण्यास सांगितले होते पण त्याने ऐकले नाही. त्यामुळे अखेर मजबुरीने कारवाई करावी लागली असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवाय यांनी या प्रकरणात काहीजण चुकीची माहिती पसरवत आहेत पण येत्या काही दिवसांत यासंबंधित अनेक खऱ्या गोष्टी समोर येतील असेही त्यांनी म्हटलं आहे.
