मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाने पाच वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये, दोन दिवसांत तब्बल 14 कोटींचे हायड्रोपोनिक वीड, हिरे आणि सोने जप्त केले आहे. या प्रकरणी विमानतळावरील एका कर्मचारी आणि ७ प्रवाशांना अटक केली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. या पाचही प्रकरणांत मिळून एकूण 14 कोटी 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पहिल्या प्रकरणात बँकॉकवरून मुंबईमध्ये आलेल्या एका प्रवाशाला आठ कोटी रुपयांच्या गांजाच्या तस्करीत अटक केली आहे. दुसऱ्या प्रकरणातही बँकॉकवरून मुंबईत आलेल्या अन्य एका प्रवाशाला एक कोटी 90 लाख रुपयांच्या गांजाच्या तस्करीप्रकरणी अटक केली आहे.
advertisement
तर तिसऱ्या प्रकरणात, एका व्यक्तीला दोन कोटी 52 लाख रुपयांच्या हिऱ्यांच्या तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. चौथ्या प्रकरणात एका व्यक्तीला 11 लाख 35 हजार रूपयांच्या सोने तस्करी प्रकरणी अटक केली आहे. पाचव्या प्रकरणात सोने तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला असून, त्यात विमानतळावरील एका कर्मचार्याचा सहभाग असल्याचे आढळून आले.
बांग्लादेशला निघालेल्या एका बांगलादेशी नागरिकाने ट्रान्झिटमध्ये असताना एक कोटी 87 लाख रुपयांचे सोने या कर्मचार्याकडे दिले. या पाचही प्रकरणांमध्ये सीमा शुल्क विभागाने प्रवाशांसह विमानतळावरील एका कर्मचाऱ्यालाही अटक केली आहे. यामुळे सीमा शुल्क विभागाकडून प्रत्येक प्रवाशाची कसून चौकशी केली जात आहे.
