संघर्षातून साकारलेले स्वप्न
३३ वर्षीय धनश्री कांबळे ही गोरेगावमधील एका बँकेत नोकरी करते. तिला महिन्याला ३३ हजार रुपये पगार आहे. तिच्या पगारातून २१ हजार रुपयांचा घराचा हप्ता भरल्यानंतर उरलेल्या १२ हजार रुपयांमध्ये ती आपल्या आई-वडिलांसह कुटुंबाचा गाडा हाकते. तिचे वडील दिनेश कांबळे (६३) यांना हृदयविकार, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास आहे. तर आई वत्सला कांबळे (६०) यांना पाठीच्या कण्याचा गंभीर आजार आहे. विशेष म्हणजे, धनश्री स्वतः लहानपणापासून एका किडनीवर जीवन जगत आहे.
advertisement
अशा परिस्थितीतही, वडिलांनी हमाली आणि आईने स्टेशनवर झाडू मारून केलेल्या कष्टातून त्यांनी धनश्रीला शिकवले. याच कष्टाच्या जोरावर तिने नोकरी मिळवून २०२२ मध्ये डोंबिवलीतील समर्थ कॉम्प्लेक्समध्ये २६ लाख रुपयांचे एक छोटेसे घर विकत घेतले. हे घर म्हणजे त्यांच्या कुटुंबाचे अनेक वर्षांचे स्वप्न होते.
महापालिकेची नोटीस आणि कुटुंबावर कोसळलेले संकट
गेले दोन वर्षे आनंदात राहत असताना, अचानक महापालिकेने ‘इमारत बेकायदेशीर’ असल्याचा फलक लावल्याने कांबळे कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. महापालिकेच्या कारवाईच्या नोटिशीने त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. 'माझे स्वप्न मोडणार, आजार वाढणार,' अशा भीतीने धनश्रीला ग्रासले आहे. आपल्या आजारी आई-वडिलांना घेऊन कुठे जावे, त्यांची देखभाल कशी करावी, असा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला आहे.
बँकेला कर्ज माफ करण्याची विनंती केल्यावर त्यांनी नकार दिला. एका बाजूला घर वाचवण्याची लढाई, तर दुसऱ्या बाजूला बँकेचा हप्ता भरण्याचे ओझे, यामुळे धनश्री हतबल झाली आहे. तिने थेट 'माझं रक्त सांडलं तरी चालेल, पण इमारतीला हात लावू देणार नाही,' अशी भूमिका घेतली आहे. तर तिच्या वृद्ध आई-वडिलांनीही ‘पेट्रोल ओतून स्वतःला संपवण्याशिवाय पर्याय नाही’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेमुळे कांबळे कुटुंब पूर्णपणे हादरले आहे.
या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि त्यांचे घर वाचवावे, अशी मागणी हे कुटुंब करत आहे. धनश्री यांनी कर्ज माफ करण्याबाबत बँकेकडे विचारणा केली, मात्र त्यांनी बँकेचे हफ्ते भरावेच लागतील, असं त्यांना सांगितलं. यामुळे धनश्री कांबळे हवालदिल झाल्या आहेत.