मुंबईमध्ये अरुण गवळी याचा अखिल भारतीय सेना हा पक्ष आहे, या पक्षाकडूनच अरुण गवळीच्या दोन मुली गीता आणि योगिता निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. गीता गवळी या 212 क्रमांच्या वॉर्डमधून तर योगिता गवळी वॉर्ड क्रमांक 207 मधून निवडणूक लढत आहेत. हे दोन्ही वॉर्ड भायखळामध्ये येतात, जिथे अरुण गवळीचं वास्तव्य असलेली दगडी चाळही आहे.
advertisement
गीता गवळी यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रामधील माहितीनुसार, त्यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता ही एकूण 7.26 कोटी रुपये आहे. यामध्ये गीता यांच्या स्वत:च्या नावावर 1 हजार ग्रॅम सोने-चांदीचे दागिने, तर पतीकडे 500 ग्रॅम दागिने आहेत. याशिवाय गीता गवळी यांच्या नावावर 30 लाखांची मर्सिडिज बेंझ जी 2023 साली घेतली होती ती आहे.
गीता गवळी यांनी 2019 ची विधानसभा निवडणूकही लढली होती, त्यावेळी त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता 3.38 कोटी रुपये होती. आताचं प्रतिज्ञापत्रं पाहिलं तर त्यांची मालमत्ता दुपटीने वाढली आहे.
वॉर्ड क्रमांक 207 मधून निवडणूक लढणाऱ्या योगिता गवळी यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता 3.65 कोटी रुपये इतकी आहे. योगिता यांच्या नावावर 750 ग्रॅम दागिने तसंच त्यांच्या पतीच्या नावावर बीएमडब्ल्यू कार याशिवाय 250 ग्रॅम दागिने आहेत. गीता गवळी यांचं शिक्षण एमएससीपर्यंत झालं आहे तर योगिता एमए शिकल्या आहेत.
गीता गवळींचा रस्ता क्लिअर?
गीता गवळी ज्या वॉर्डमधून निवडणूक लढत आहेत त्या वॉर्ड क्रमांक 212 मध्ये भाजपने मंदाकिनी खामकर यांना एबी फॉर्म दिला होता, पण तरीही खामकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची संधी हुकली. फॉर्म भरण्यासाठी मंदाकिनी खामकर 15 मिनिटं उशीरा पोहोचल्या, त्यामुळे निवडणूक आयोगाने खामकर यांचा अर्ज दाखल करून घेतला नाही.
वॉर्ड क्रमांक 212 मध्ये भाजपचा उमेदवार नसल्यामुळे या वॉर्डमध्ये गीता गवळी यांच्यासमोर मनसेच्या श्रावणी हळदणकर यांचं आव्हान आहे. तसंच काँग्रेस आणि अपक्षांनीही उमेदवारांना रिंगणात उतरवलं आहे.
