आनंद दिघे यांच्या यांच्या जीवनावर आधारित प्रवीण तरडे दिग्दर्शित 'धर्मवीर-२' हा मराठी चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यावरूनच प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी आनंद दिघे यांचा मृत्यू नसून घातपात झाल्याचे म्हटले. त्यांचा हा रोख कुणाकडे आहे, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
ते हॉस्पिटल कायमचे बंद का करण्यात आले?
advertisement
आनंद दिघे यांचा मृत्यू झालेला नसून त्यांचा घातपात झाल्याचे अख्ख्या ठाण्याला माहिती आहे. ते ज्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेते होते, ते हॉस्पिटल कायमचे बंद का करण्यात आले? त्यांचा मृत्यू कसा झाला, हे अनेकांना अनेक वर्षापासून पडलेले कोडे आहे. मलाही तो प्रश्न पडलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी चौकशीची मागणी करतो, असे शिरसाट म्हणाले.
ठाण्यापासून ते मातोश्रीपर्यंत आनंद दिघे यांचा वावर होता
आनंद दिघे ज्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते, त्या हॉस्पिटलला आग लावली. तिथे अनेक रुग्ण उपचार घेत होते. तिथल्या रुग्णांना वाचविण्याचे काम शिवसैनिकांनी केले. वाचविणाऱ्यांमध्ये एकनाथ शिंदे हे अग्रस्थानी होते, असेही शिरसाट यांनी आवर्जून सांगितले. तसेच ठाण्यापासून ते मातोश्रीपर्यंत आनंद दिघे यांचा वावर होता. मातोश्रीमध्ये आमचे दैवत होते. त्यांच्याकडे गेल्यानंतर सगळ्यांचे समाधान व्हायचे. परंतु आता मातोश्रीचे लोक सिल्वर ओकवर बसलेले असतात. आम्हाला सिल्वर ओकवर जायचे नव्हते. म्हणून आम्ही सुरत मार्गे गुवाहाटीला गेलो. हे लक्षात यायला त्यांना काही काळ लागेल, असा टोला शिरसाट यांनी लगावला.
शिरसाट यांना केदार दिघे यांचे प्रत्युत्तर
गेल्या २३ वर्षांपासून हा प्रश्न काही अंतराने विचारला जातोय. जर शिरसाट यांच्याकडे काही पुरावे असतील, तर त्यांनी माझ्याकडे पुरावे द्यावे. मी न्यायालयात पुरावे देतो. लोकांसमोर भुलथापा मारायच्या, कोणतेही सत्य समोर आणायचे नाही आणि त्यातल्या राजकारणातून फक्त पोळी भाजून घ्यायची हेच यांचे काम असल्याचे सांगत ठाकरे गटाचे नेते तथा आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी शिरसाट यांच्यावर पलटवार केला.
