निवडणुकांची घोषणा झाल्यावर खूप बातम्या येतात की पैसे जप्त केले, दारू जप्त केली. मात्र या पैशांचे आणि दारूचे जप्तीनंतर काय होते हे अनेकांना माहीत नसते. खरं तर प्रत्येक उमेदवाराला निवडणूक खर्चाची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. मात्र त्यापेक्षा खूप जास्त पैसे खर्च केले जातात. तर दुसऱ्या बाजूला मतदारांना आमिष दाखवण्यासाठी दारू, रोख रक्कमेचा वापर होतो. पोलीस छापेमारी किंवा तपासादरम्यान जी दारू व रोख रक्कम जमा करतात त्याचं नंतर काय होतं ते जाणून घेऊयात.
advertisement
जप्त केलेल्या दारूचे काय होते?
निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि दारूही पोलिसांकडून जप्त केली जाते. जी दारू जप्त होते त्याचं प्रशासन काय करतं? असा प्रश्न तुम्हालही पडत असेल. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणुकीदरम्यान सापडलेली दारू सर्वात आधी एका ठिकाणी जमा केली जाते, त्यानंतर ती एकत्र नष्ट केली जाते.
जप्त केलेले पैसे कुठे जातात?
निवडणुकीच्या काळात पोलिसांनी एखाद्या ठिकाणावरून इतके कोटी जप्त केले, इतके जण पकडले, अशा बातम्या कानावर येतात. तर पोलीस जी रोकड जप्त करतात, ती कुठे जाते असा प्रश्न अनेकांना पडतो. तर पोलीस ते पैसे आयकर विभागाकडे सोपवते. मात्र ज्या व्यक्तीकडून ही रोख रक्कम जप्त करण्यात आली असते ती व्यक्ती या पैशांसाठी दावा करू शकते. पण ते पैसे आपलेच आहेत असं त्या व्यक्तीला सिद्ध करावं लागतं. हे पैसे अवैधरित्या कमवले नाहीत आणि आपलेच आहेत असं जर ती व्यक्ती सिद्ध करू शकली तर पोलीस ते पैसे परत करू शकतात. जप्त केलेल्या पैशांवर जर कोणीही दावा केला नाही तर ते सरकारी तिजोरीत जमा केले जातात.
