पनवेल, 30 नोव्हेंबर : हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव ताकतोडा या गावाच्या परिसरातून 11 शेतकरी आपल्यावर असलेले बँकांचे पीक कर्ज फेडण्यासाठी आपले किडनी डोळे, लिव्हर असे अवयव विक्रीला काढले होते याच अनुषंगाने आज त्यांनी मुंबईत येऊन अनोखा आंदोलन केलं.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपले अवयव खरेदी करा अशी विनंती केली होती. तत्पूर्वी मातोश्री वर जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होते. मात्र त्याची भेट होऊ शकली नाही. खासदार विनायक राऊत यांची भेट झाली. त्यांच्याशी चर्चा करून हे सर्व शेतकरी मंत्रालयापुढे हे आंदोलन करणार होते. तत्पूर्वी त्यांना पोलिसांनी या सर्व शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात नेले. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
advertisement
का करताय आंदोलन?
अतिवृष्टीचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात यंदा पावसाने दडी मारल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आत्महत्यांचा वेग वाढला आहे. हिंगोली जिल्ह्यातून शेतकऱ्यांनी बँकाचे कर्ज फेडण्यासाठी चक्क स्वतःचे अवयव विक्रीला काढले आहेत.
हिंगोलीतील माझोड, ताकतोडा, गोरेगाव, केंद्रा बुद्रुक या गावांतील दहा शेतकऱ्यांनी बँकांचे कर्ज फेडण्यासाठी चक्क स्वतःचे अवयवच विक्रीला काढले आहेत. आमचे किडनी, लिव्हर, डोळे हे अवयव खरेदी करा अशी विनंती त्यांनी शासनाला केली आहे, या शेतकऱ्यांनी तसे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. जिल्ह्यात यंदा पावसाचा खंड पडला, त्याचबरोबर सोयाबीनवर यलो मोझॅक रोग आला. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. परंतु, आम्हाला शासनाचे अनुदान मिळाले नाही किंवा पिक विमा देखील मिळाला नाही, त्यामुळे बँकांचे पिक कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न या शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय. स्वतःचे अवयव विक्री करण्याचे हे दरपत्रक सध्या व्हायरल होत आहे. हे शेतकरी मुंबईत आज मंत्रालयासमोर आंदोलन करणार होते, पण त्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.
