मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर दोन दिवसांपासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अंत्यदर्शनासाठी त्यांना माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळात ठेवण्यात येणार आहे. दुपारी 2 नंतर अंत्ययात्रा सुरू होईल.
मनोहर जोशींचा जन्म 2 डिसेंबर 1937 रोजी झाला. शिक्षणाच्या निमित्ताने मुंबईत स्थलांतर केले. त्यांनी एम ए आणि एलएलबीची पदवी घेतली. मुंबईत कोहिनूर नावाचे शिकवणीचे वर्ग सुरू केले होते. याशिवाय मुंबई पालिकेत अधिकारी पदावर कामही केले. 1976-1977 काळात मुंबईचे महापौर होते.
advertisement
शिवसेनेकडून 1990-1991मध्ये विधानपरिषदेवर वर्णी लागली. त्यानंतर 1995 मध्ये शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री झाले. शिवाजी पार्कवर भव्य शपथविधी पार पडला होता. 1999 ते 2002 केंद्रीय मंत्रिमंडळात मानव संसाधन विकास मंत्री म्हणूनही काम पाहिले. 2002 ते 2004 लोकसभेच्या अध्यक्षपदी वर्णी लागली. 2004 मध्ये लोकसभा निवडणुकीत 8 हजार मतांनी पराभव झाला होता.
मनोहर जोशी हे बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्तीयांपैकी एक होते. त्यांना जोशी सर असंही संबोधलं जायचं. गेल्या काही काळापासून राजकारणात मनोहर जोशी फारसे सक्रिय नव्हते. मनोहर जोशींनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषद सदस्य, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्यपदही भुषवलं होतं.