मुंबईच्या अपोलो बंदरावर उभं असलेलं ‘गेटवे ऑफ इंडिया’ हे स्मारक केवळ पर्यटकांसाठी प्रसिद्ध नाही. तर भारतीय स्वातंत्र्याचा एक महत्वाचा टप्पा म्हणून इतिहासात अजरामर आहे. कारण, 28 फेब्रुवारी 1948 रोजी याच गेटवे ऑफ इंडिया मधून ब्रिटिश सैन्याची शेवटची तुकडी भारतातून कायमची परतली. या घटनेने जवळपास 200 वर्षांच्या ब्रिटिश सत्तेचा औपचारिक शेवट झाला.
advertisement
स्वातंत्र्यानंतरही इंग्रज भारतात का होते?
डोमिनियन स्टेटस: 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, पण तो ब्रिटिश डोमिनियन म्हणून ओळखला जात होता. म्हणजेच भारत पूर्णपणे स्वतंत्र राष्ट्र नव्हते, तो अजूनही ब्रिटिश राजा जॉर्ज सहाव्याच्या अधिपत्याखाली होता.
ब्रिटिश गव्हर्नर जनरल: लॉर्ड माऊंटबॅटन हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते, ते ब्रिटिश होते. त्यांनी जून 1948 पर्यंत भारतात ब्रिटिश सरकारच्या वतीने प्रशासन चालवलं.
सैन्य नियंत्रण: भारताच्या स्वातंत्र्यानंतरही लष्कराचं नेतृत्व ब्रिटिश जनरलांकडे होतं. जनरल के. एम. करियप्पा यांनी 15 जानेवारी 1949 रोजी पहिले भारतीय सेनाप्रमुख म्हणून पदभार घेतला.
प्रशासन व फाळणी: भारत-पाकिस्तान फाळणीनंतर मोठ्या प्रमाणावर दंगे, स्थलांतर व अराजक माजलं. या परिस्थितीत अनुभव असलेले ब्रिटिश अधिकारी काही काळ प्रशासनात मदत करत राहिले. त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही भारतात सत्ता पूर्णपणे भारतीयांच्या हाती यायला वेळ लागला. त्या काळात ब्रिटिश अधिकारी प्रशासन, सैन्य आणि कायदा या क्षेत्रात सक्रिय होते.
ब्रिटिशांची शेवटची तुकडी
ब्रिटीश लष्करातील शेवटची तुकडी फर्स्ट बटालियन ऑफ द समरसेट लाइट इन्फंट्री 18 फेब्रुवारी 1948 रोजी शिस्तबद्ध रितीने गेटवेच्या प्रांगणातून अपोलो बंदराच्या दिशेने निघाली. हजारो मुंबईकरांनी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली होती. काही जणांनी आनंदाने जल्लोष केला, काहींनी अश्रू ढाळले. कारण ही फक्त सत्ता बदलण्याची नव्हे, तर एका युगाच्या समाप्तीची साक्ष होती.
दरम्यान, आजही हजारो पर्यटक गेटवे ऑफ इंडिया पाहायला येतात, पण फार थोड्यांना माहिती असतं की हे स्थळ केवळ एक सुंदर स्मारक नाही, तर भारतीय स्वातंत्र्याच्या शेवटच्या अध्यायाची साक्ष देणारं एक ठिकाण आहे.