दादर, मुंबई सेंट्रल आणि वांद्रेवरील गर्दी कमी होणार
आता पश्चिम रेल्वे प्रशासनाने या प्रकल्पाला गती दिली असून काम वेगाने सुरू आहे. जोगेश्वरी टर्मिनस सुरू झाल्यानंतर दादर, मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनसवरील प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
रखडलेला जोगेश्वरी टर्मिनस अखेर सुरू होणार
जोगेश्वरी टर्मिनस हे मुंबईतील पश्चिम रेल्वेचे चौथे रेल्वे टर्मिनस ठरणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे 76.48 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. टर्मिनसचे सर्व काम मार्च 2027 पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
advertisement
सध्या जोगेश्वरी येथील सहाय्यक टर्मिनल यार्डचा वापर केवळ गाड्या उभ्या करण्यासाठी केला जातो. मात्र टर्मिनसचे काम पूर्ण झाल्यानंतर येथून लांब पल्ल्याच्या गाड्यांची नियमित वाहतूक सुरू होणार आहे. दररोज सुमारे 24 गाड्यांची हाताळणी येथे होऊ शकेल.
पहिल्या टप्प्यात दोन प्रवासी प्लॅटफॉर्म तयार केले जाणार असून एक प्लॅटफॉर्म स्थानकाच्या बाजूला तर दुसरा दोन रुळांमध्ये असेल. यामुळे एकाचवेळी तीन लांब पल्ल्याच्या गाड्या हाताळणे शक्य होईल. दुसऱ्या टप्प्यात अतिरिक्त प्लॅटफॉर्म, पिट लाइन आणि शंटिंग नेक उभारण्यात येणार आहे.
