याच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर नवीन मार्गिका उभारण्याचे काम सुरू आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन प्रकल्पाचे व्यवस्थापन करत असून, विरार-डहाणू रेल्वेमार्गाचे चौपदरीकरण हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 64 किमीच्या मार्गावर सात नवीन स्थानकांची उभारणी केली जाणार आहे. हे शहराच्या रेल्वे नेटवर्कमध्ये एकाच प्रकल्पांतर्गत इतकी स्थानके जोडण्याचे पहिले उदाहरण ठरणार आहे.
advertisement
या प्रकल्पासाठी अंदाजे 3,578 कोटी रुपये खर्च होणार आहेत आणि जून 2027 पर्यंत हा मार्ग सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या विरार-डहाणू मार्गावर नऊ स्थानके कार्यरत आहेत, ज्यात विरार, वैतरणा, सफाळे, केळवे रोड, पालघर, उमरोली, बोईसर, वाणगाव आणि डहाणू रोड यांचा समावेश आहे. या स्थानकांव्यतिरिक्त आणखी सात स्थानकांची उभारणी होणार आहे, ज्याची संभाव्य नावे वाढिव, सरतोडी, माकुणसार, चिंचपाडा, पंचाळी, वंजारवाडा आणि BSES कॉलनी अशी आहेत.
विरार-डहाणू मार्गावरील सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. विरार स्थानकातून दररोज अंदाजे 5.8 लाख प्रवासी प्रवास करतात, तर डहाणू मार्गातून 2.6 लाख नागरिक प्रवास करतात. लहान स्थानकांमधूनही हजारो प्रवासी नियमित प्रवास करत आहेत, ज्यामुळे स्थानकांवर ताण अधिक जाणवतो.
नवीन मार्गिका सुरू झाल्यानंतर विरार ते डहाणू दरम्यान आणि चर्चगेट ते डहाणू दरम्यान रेल्वे सेवा वाढविण्यास मदत होईल. सध्या चर्चगेट ते डहाणू दरम्यान दिवसातून 6-7 थेट गाड्या धावतात तर चौपदरीकरणानंतर या मार्गावर 200 पेक्षा अधिक सेवा चालवल्या जाऊ शकतात.
सध्या विरार, वैतरणा, सफाळे, केळवे रोड, डहाणू रोड आणि उमरोली स्थानकांसह पुलांवर स्टेशन इमारतींचे बांधकाम सुरु आहे. या नव्या प्रकल्पामुळे केवळ प्रवाशांची सुविधा वाढणार नाही, तर शहरातील लोकल प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होईल.
मुंबईकरांसाठी हा प्रकल्प मोठा दिलासा ठरणार आहे, कारण या विस्तारामुळे उपनगरातील नागरिकांना शहरातील नोकरी, शिक्षण आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी प्रवास करणे अधिक सोयीस्कर होईल. आगामी काळात पश्चिम रेल्वे मार्गावर या नव्या स्थानकांमुळे लोकल प्रवासाचा अनुभव अधिक गतीमान आणि आरामदायक होण्याची अपेक्षा आहे.