शिवसेनेचा बालेकिल्ला...
शिवडी मतदारसंघात लालबाग-परळ-शिवडी हा गिरणगावचा भाग येतो. हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. मराठी भाषिकांचे प्राबल्य या मतदारसंघात आहे. शिवसेनेचे अजय चौधरी विद्यमान आमदार आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर अजय चौधरी यांनी उद्धव ठाकरेंच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला. शिवसेना ठाकरे गट या ठिकाणाहून अजय चौधरी अथवा सुधीर साळवी यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे.
advertisement
महायुतीतही शिवडीवरून पेच...
तर, महायुतीतही शिवडी विधानसभेचा पेच कायम असल्याचे चित्र आहे. शिवसेना शिंदे गटाने आपला उमेदवार जाहीर केला नाही. शिंदेच्या शिवसेनेकडे शिवडीत कुठलाही बडा चेहरा नसल्याने भाजपने शिवडी विधानसभा मतदार संघावर दावा केला आहे.
भाजपकडून कोणाची दावेदारी?
शिवडी विधानसभेतून भाजपमधून गोपाळ दळवींच्या नावाची चर्चा आहे. नवरात्र,दहीहंडीत शिवडीच्या विकासासाठी बदल आशयाचे बॅनर लावत दळवींनी आपल्या उमेदवारीचा दावा ठोकला होता. मराठी दांडिया व दहीहंडी उत्सवातही सेलिब्रिटींची शिवडीत रीघ लावत मराठी मतांना आपल्याकडे वळवण्यासाठी दळवींनी प्रयत्न केल्याची चर्चा आहे. आता, महायुतीच्या जागा वाटपात भाजपच्या गोपाळ दळवींना संधी देणार? की जागा शिवसेना शिंदे गटाला सोडणार? याकडे लक्ष लागले आहे.
