शिवसेना ठाकरे गटासाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. शिवसेनेतील फुटीनंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेसमोर मोठे आव्हान असणार आहे. त्यासाठी शिवसेनेने अनेक ठिकाणी जिंकण्याच्या निकषावर पक्ष प्रवेश देत काहींना उमेदवारी जाहीर केली.
विधीमंडळ गटनेत्याचे नावच नाही....
बुधवारी, ठाकरे गटाने आपली 65 उमेदवारांची यादी जाहीर केली. पण, त्यात पक्ष फुटीनंतर विधीमंडळात पक्षाचे गटनेते असणारे अजय चौधरी यांच्या नावाचा समावेश नव्हता. त्यामुळे शिवडी मतदारसंघातून उमेदवार कोण असणार याची चर्चा सुरू झाली आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांचे नाव सध्या चर्चेत आहे.
advertisement
कोणाचे नाव आघाडीवर?
काही दिवसांपूर्वी सुधीर साळवी यांची मातोश्रीवर बैठकही झाली होती. त्यानंतर अजय चौधरी आणि सुधीर साळवी यांच्यासह उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली होती. सुधीर साळवी यांचे नाव आघाडीवर आहे. लालबाग-शिवडी-परळ हा भाग गिरणगावातील भाग शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. हा बालेकिल्ला काबीज करण्याचा प्रयत्न शिंदे गट-भाजपकडून सुरू आहे. त्यामुळे ठाकरेंना या भागातून चांगला उमेदवार देण्याचे आव्हान आहे. यामुळेच ठाकरे गटाच्या पहिल्या यादीत बालेकिल्ला असलेल्या भागातील उमेदवाराचे नाव नव्हते, अशी चर्चा आहे.
सुधीर साळवी हे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून लालबाग आणि परिसरातील सामाजिक कार्यात चांगलेच सक्रिय आहेत. त्याशिवाय, त्यांनी लोकसभा निवडणुकीतही शिवसेना ठाकरे गटासाठी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. अजय चौधरी यांची जुने शिवसैनिक म्हणून परिसरात ओळख आहे. दगडूदादा सकपाळ यांच्यानंतर त्यांना आमदारकीसाठी उभे करण्यात आले, त्यात ते विजयी झाले. शिवसेना फुटल्यानंतही त्यांनी ठाकरेंना साथ दिली. उद्धव यांनी त्यांना विधीमंडळ पक्षाचे गटनेतेपद दिले.
