शिवसेना ठाकरे गटाने बुधवारी सायंकाळी आपल्या 65 जागांची यादी जाहीर झाली. मात्र, या यादीत महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांना सोडण्यात आलेल्या जागांचा समावेश आहे. ही बाब लक्षात येताच संजय राऊत यांनी ही प्रशासकीय चूक असल्याची सारवासारव केली.
उमेदवार यादीत नाव, सामनात उल्लेखही नाही....
शिवसेनेने आपले मुखपत्र सामनामधून उमेदवारांचे नाव आणि फोटो प्रसिद्ध केले. मात्र, बुधवारी जाहीर झालेल्या यादीतील काहींची नावे सामनात नसल्याचे समोर आले.
advertisement
धाराशिव परंडा मतदार संघात उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संभ्रमाचे वातावरण झाले. काल रात्री करण्यात आलेल्या उमेदवारी यादीत नाव होते. पण सामना वृत्तपत्रात जाहीर झालेले नाव वगळण्यात आले. सामना वृत्तपत्रात नाव व फोटो नसल्याने संभ्रम अधिक वाढला. ठाकरे या मतदारसंघात दिवंगत ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र रणजीत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. रणजीत पाटील यांना उमेदवारी मिळाल्यामुळे शरद पवार पक्षाचे माजी आमदार राहुल मोटे यांना धक्का बसला. मात्र, शरद पवार गटाने त्यांना संयमी भूमिका घेण्याची सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.
या जागांवर वाद...
लोहा मतदारसंघातून ठाकरेंनी एकनाथ पवारांना उमेदवारी दिली आहे, पण तिकडून शेकापचे शामसुंदर शिंदे आमदार आहेत. परंड्यामधून ठाकरेंच्या शिवसेनेने राहुल पाटील यांना उमेदवारी दिली आहे, पण या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि माजी आमदार राहुल मोटे लढण्याच्या तयारीत आहेत. तर सांगोल्यात उद्धव ठाकरेंनी दीपक आबा साळुंखे यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातून आधीच महाविकास आघाडीतले मित्रपक्ष असलेल्या शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी बाबासाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
फॉर्म्युला ठरला पण 15 जागांवर वाद...
तिन्ही प्रमुख पक्षांमध्ये 85-85-85 जागांवर तोडगा निघाला आहे, तर 18 जागा या छोट्या पक्षांना दिल्या जाणार असल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीचा 85-85-85 असा 255 जागांचा तिढा सुटला आहे, तर 18 जागा मित्रपक्षांना दिल्या जाणार आहेत. तर, त्यामुळे 15 जागांचा वाद अजूनही आहे.
