महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे भाजपने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 'त्याग' करण्यास सांगितले असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर आता रविवारी भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर शिवसेना शिंदे गटावर भाजप वरचढ झाल्याची चर्चा रंगली आहे.
भाजपने ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, त्यातील एका उमेदवाराच्या नावामुळे शिवसेना शिंदे गटातील स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजपने कल्याण पूर्वमधून विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यात मोठा वाद आहे. गणपत गायकवाडांनी महेश गायकवाड यांच्यावर भर पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या झाडल्या. या गोळीबाराच्या घटनेत महेश गायकवाड जखमी झाले होते. तर, स्थानिक पातळीवरील वादही उफाळून आल्याचे दिसले.
advertisement
सूत्रांच्या माहितीनुसार, गणपत गायकवाड यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी शिवसेना शिेंदे गटाच्या स्थानिक नेत्यांनी केली होती. गायकवाड यांच्याऐवजी दुसऱ्या उमेदवाराची मागणी करण्यात आली होती. मात्र, भाजपने कल्याण पूर्वमधील उमेदवारी ही गणपत गायकवाड यांच्या घरात देण्यात आली. त्यानंतर, आता शिंदे गटाचे स्थानिक पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.
महेश गायकवाड शिंदे गटाला जय महाराष्ट्र करणार?
सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता महेश गायकवाड अपक्ष निवडणूक लढवणार का, याकडे लक्ष लागले आहे. महेश गायकवाड यांच्यासोबत त्यांचे समर्थकही शिंदे गटातून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
