राज्यातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते हे सध्या दिल्लीत आहेत. दिल्लीत काँग्रेस उमेदवारांची यादी निश्चित करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे राज्यात जागा वाटपावरून शिवसेना ठाकरे गटासोबत सुरू असलेल्या वादावरही काँग्रेसमधील पक्षश्रेष्ठी आणि राज्यातील नेत्यांमध्ये चर्चा झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबतच्या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाच्या आडमुठ्या भूमिकेवर प्रश्नच उपस्थित केले.
काँग्रेसच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी काय?
advertisement
मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत राज्यातील काँग्रेस नेत्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गट काँग्रेसचीच जागा का मागतात?राष्ट्रवादीच्या जागा का मागत नाही? असा सवाल केला. जागा वाटपात काँग्रेसला शिवसेनेकडून वेठीस धरलं जात असल्याची तक्रार करताना आघाडीचा धर्म फक्त कॉंग्रेसनेच पाळायचा का? असा सवालही राज्यातील नेत्यांनी खर्गे यांना केला. काँग्रेस नेत्यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी पक्षाचे संघटन नाही त्या ठिकाणची जागा आम्ही कधी मागितली नाही. या उलट आता शिवसेना ठाकरे गटाने ताठर भूमिका सोडावी अशी अपेक्षाही काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली.
काहीही होवो, 'त्या' 12 जागा सोडू नका..
शिवसेना ठाकरे गटाच्या भूमिकेवर राज्यातील काँग्रेस नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शिवसेना ठाकरे गटाकडून जागावाटपात सहकार्य केले जात नसल्याचा राज्यातील नेत्यांचा सूर होता. काहीही करा मात्र विदर्भातील त्या 12 जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडू नका, अशी आग्रही भूमिका काँग्रेस नेत्यांनी मांडली.
लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसचे राज्यातील कार्यकर्ते सक्रिय झाले असून अनेक जागांवर काँग्रेस उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यामुळे त्या जागांबाबत झुकतं माप घेऊ नका असेही राज्यातील नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांना सांगितले. शिवसेना ठाकरे गटाची भूमिका ही सांगलीच्या जागेसारखीच आहे. त्यामुळे यावर वरिष्ठांनी विचार करावा असेही राज्यातील काँग्रेस नेत्यांनी खर्गे यांना सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.
