महाविकास आघाडीत जागावाटप वरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस नेते यांच्यात वाद सुरू आहे. विदर्भसह इतर काही ठिकाणच्या जागांवरून वाद सुरू आहे. शनिवारी मुंबईत जागा वाटपासाठी 10 तासांची बैठक पार पडली. तरीदेखील तोडगा निघाला नाही. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस कडून ताठर भूमिका घेतली जात असल्याने जागा वाटपाचा वाद सुरू आहे.
advertisement
शरद पवार नाराज?
महाविकास आघाडीत पेच सोडवण्यासाठी शरद पवारांची पुन्हा वरिष्ठ काँग्रेस नेत्यांशी फोनवरुन चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसकडून ताठर भूमिका घेण्यात येत असल्याचे शरद पवार देखील नाराज झाले असल्याची चर्चा आहे. जागा वाटपावरुन सुरू असलेल्या वादावर मार्ग काढण्यासाठी शरद पवार अॅक्शन मोडवर आले आहेत.
आदित्य यांनी घेतली पवारांची भेट...
दरम्यान, मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची बैठक सुरू होण्याआधी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीबाबत आदित्य ठाकरे यांनी कोणतेही भाष्य केले नाही. शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर आदित्य ठाकरे मातोश्रीवर रवाना झाले.
शनिवारच्या बैठकीत राऊत-पटोलेंमध्ये खडाजंगी
शनिवारी रात्रीच्या बैठकीत ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये खटके उडल्याची माहिती सूत्रांनी दिली. नाशिक पश्चिम जागेवर ठाकरे गटाने सुधाकर बडगुजर यांना तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. तर, काँग्रेस देखील या जागेवर आग्रही आहे. या जागेवर नाना पटोले आणि संजय राऊत दोघेही अडून बसले. त्यानंतर संजय राऊत तडकाफडकी निघून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. नाशिक पश्चिम हा मतदारसंघ आपल्यासाठी सोडावा अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने याआधीच मविआकडे केली आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मातोश्रीवर
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शनिवारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. महाविकास आघाडीमध्ये काही बिघडू नये यासाठी रमेश चेन्नीथला यांना मातोश्रीवर पाठवण्यात आले अशी माहिती आहे. महाविकास आघाडीमध्ये सर्व काही ठीक आहे. आमच्यामध्ये कुठलाही भेदभाव नाही. आम्ही सर्वजण एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहोत, असे चेन्नीथला यांनी ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर सांगितले.
इतर संबंधित बातमी :
