राज्याची विधानसभा निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे. ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचा अंदाज आहे. त्यातच आता समीर वानखेडे निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
समीर वानखेडेचा पक्ष कोणता?
विधानसभा निवडणुकीत समीर वानखेडे हे शिवसेना शिंदे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. मुंबईतील धारावी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून IRS अधिकारी समिर वानखेडे यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. धारावी विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी आरक्षित मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून IRS अधिकारी समिर वानखेडे यांच्या नावाची चाचपणी शिवसेनेकडून केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. धारावी मतदारसंघात मुस्लिम मतदारांचेही प्रमाण चांगले आहे. त्याचा फायदा समीर वानखेडे यांना होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
advertisement
क्रांती रेडकरने काय म्हटले?
दरम्यान, समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी म्हटले की, पक्ष प्रवेशासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल. याबाबत अधिक़ृत भूमिका लवकरच स्पष्ट करू असे क्रांती रेडकर यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले.
समीर वानखेडे यांनी एका क्रूझवर अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान आणि त्याच्या काही मित्रांना अटक केली होती. या प्रकरणाची मोठी चर्चा झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर समीर वानखेडे वादाच्या भोवऱ्यात अडकले.
