शिवसंग्रामच्या ज्योती मेटे आपला राजकीय निर्णय घेतला आहे. ज्योती मेटे यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. शरद पवारांनी त्यांना विधानसभेचे तिकीट देता आले नाहीतर विधानपरिषदेवर पाठविण्याचा शब्द दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, याबाबत कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात आले नाही. ज्योती मेटे बीड लोकसभेची निवडणूक लढण्यास उत्सुक होत्या. त्यावेळीही त्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. पण, पवारांनी बजरंग सोनवणे यांना तिकीट दिले.
advertisement
आताही ज्योती मेटे यांनी विधानसभेसाठी चाचपणी सुरू केली आहे. रविवारी त्यांनी शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आदींच्या उपस्थितीत प्रवेश केला. बीडमध्ये सध्या शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर हे आमदार आहेत. अजित पवारांनी बंड केल्यानंतर संदीप क्षीरसागर हे शरद पवारांच्या सोबतच राहिले आहेत. त्याशिवाय, लोकसभेला बजरंग सोनवणे यांच्या विजयातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे संदीप क्षीरसागर यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे. तर, ज्योती मेटे यांना प्रवेश देऊन पवार यांनी बीड विधानसभेची जागा आणखीच सुरक्षित केल्याची चर्चा आहे. या मतदारसंघात मराठा मतदारांचे प्राबल्य अधिक आहे.
