वरळी मतदारसंघातून सध्या भाजपच्या नेत्या शायना एन सी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र, शायना एन सी या शिवसेना शिंदे गटाच्या धनुष्य बाण निवडणूक चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचे म्हटले जात आहे. शायना एन सी यांनी मतदारसंघाचा दौरादेखील सुरू केला आहे. तर, दुसरीकडे वरळीतील शिंदे गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. सोमवारी, रात्री शिंदे गटाचे कार्यकर्ते वरळीत रस्त्यावर उतरले होते.
advertisement
वरळी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व सध्या आदित्य ठाकरे करत आहेत. त्याआधी या ठिकाणाहून शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे हे आमदार होते. त्याशिवाय आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले आणि सध्या ठाकरे गटात असलेले सचिन अहिर यांनी देखील या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे.
शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक
वरळीत शिवसेना शिंदे गटाकडून शायना एन सी या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यांच्या उमेदवारीला शिंदे गटातूनच विरोध होऊ लागला आहे. शिंदे गटाच्या नाराज असलेल्या कार्यकर्त्यांनी स्थानिक उमेदवाराची मागणी केली आहे. वरळी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारा हा स्थानिकच उमेदवार हवा अशी मागणी केली आहे. स्थानिक उमेदवार असल्यास विजय आणखी सोपा होईल असे शिंदे गटाने म्हटले.
वरळीत बाहेरच्या उमेदवारांची गर्दी
2019 च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी एन्ट्री केली. ठाकरे कुटुंबाकडून पहिलीच व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघाला पसंती देत येथून निवडणूक लढवली. राज्यात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्यासमोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न महायुती आणि मनसे यांच्याकडून सुरू झाला आहे. मनसेकडून या मतदारसंघातून संदीप देशपांडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यांनी मागील काही महिन्यापासून वरळीवर लक्ष केंद्रीत केले.
तर, दुसरीकडे शायना एन सी यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. शायना एन सी देखील स्थानिक उमेदवार नाहीत. त्यामुळे स्थानिकांना संधी न देता बाहेरील उमेदवारांना लादले जातेय असा सवाल शिंदे गटाने उपस्थित केला आहे.
